अल्पसंख्याक शिष्यवृत्तीच्या नूतनीकरणास शाळांचा ठेंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 02:17 PM2018-10-19T14:17:26+5:302018-10-19T14:18:25+5:30
मॅट्रिकपूर्व अल्पसंख्याक शिष्यवृत्तीसाठी अद्यापही २६ हजार १७९ विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे बाकी आहेत.
अकोला: मॅट्रिकपूर्व अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजनेचे आॅनलाइन नव्याने आणि भरलेल्या अर्जांचे नूतनीकरण करून पडताळणी करण्याचे काम २३ जुलैपासून सुरू आहे; परंतु शाळा त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने, शिक्षण विभागालासुद्धा शिष्यवृत्तीचे नव्याने अर्ज भरण्यासाठी आणि नूतनीकरणासाठी वारंवार मुदत वाढवावी लागत आहे. मॅट्रिकपूर्व अल्पसंख्याक शिष्यवृत्तीसाठी अद्यापही २६ हजार १७९ विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे बाकी आहेत.
मॅट्रिकपूर्व अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजनेचे आॅनलाइन अर्जांच्या पडताळणीचे काम शिक्षण विभागाच्या माध्यमातून २३ जुलै २0१८ पासून करण्यात आले आहे. यासंदर्भात शाळा, मुख्याध्यापकांना वारंवार सूचनासुद्धा देण्यात आल्या, नंतरही त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. यापूर्वी शिष्यवृत्तीच्या नूतनीकरणाचे आणि नव्याने अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३0 सप्टेंबरपर्यंत होती; परंतु शाळा, मुख्याध्यापकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने, शिक्षण विभागाने ही मुदत दुसºयांदा ३१ आॅक्टोबरपर्यंत वाढविली आहे. शाळांनी विद्यार्थ्यांचे नव्याने आणि भरलेल्या अर्जांचे नूतनीकरण करून घ्यावेत, अन्यथा विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास, शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही. ही जबाबदारी पूर्णत: मुख्याध्यापक व शाळेची राहील. नूतनीकरणासाठी जिल्ह्याचे ४४,९१0 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांच्या याद्या इन्स्टिट्युट लॉगिनला एनएसपीकडून टाकण्यात आल्या आहेत. या विद्यार्थ्यांचे उत्पन्न व मागील वर्षाच्या परीक्षेचे शेकडा प्रमाण टाकून, अर्ज भरावयाचे होते; परंतु आतापर्यंत केवळ १८ हजार ७३१ विद्यार्थ्यांच्या नूतनीकरणाचे अर्ज भरून झाले आहेत. (प्रतिनिधी)