शाळा सिद्धी मूल्यांकनात केवळ ८८ शाळा पास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2017 01:45 AM2017-04-06T01:45:55+5:302017-04-06T01:45:55+5:30
अकोला- मनपाची एकही शाळा ए ग्रेड प्राप्त करू शकली नाही. जिल्ह्यातील ९६० शाळांमध्ये कोणत्याच प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना डी ग्रेड देण्यात आला.
मनपाची एकही शाळा ‘ए ग्रेड’मध्ये नाही: ९६० शाळांमध्ये विद्यार्थी सुविधांपासून वंचित
नितीन गव्हाळे - अकोला
शाळा सिद्धी योजनेंतर्गत प्राथमिक, माध्यमिक शासकीय व खासगी शाळांचे मूल्यांकन करून शाळांमधील सोयी-सुविधा, इमारत, विद्यार्थी संख्या आदींची आॅनलाइन माहिती मागविली होती. या शाळा सिद्धी योजनेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, यात केवळ ८८ शाळांनी ‘ए ग्रेड’ प्राप्त केला. मनपाची एकही शाळा ए ग्रेड प्राप्त करू शकली नाही. जिल्ह्यातील ९६० शाळांमध्ये कोणत्याच प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना डी ग्रेड देण्यात आला.
शासनाने राज्यात शाळा सिद्धी योजना सुरू करून शाळांनीच शाळेत असणाऱ्या सोयी-सुविधांचे मूल्यांकन करून त्याचा अहवाल आॅनलाइन पुण्यातील शैक्षणिक संस्था विद्या प्राधिकरणाकडे पाठविण्यास सांगितले होते. यूजीसीच्या नॅक कमिटीद्वारे वरिष्ठ महाविद्यालयांचे मूल्यांकन करून त्यांना ग्रेड दिला जातो. त्याच पृष्ठभूमीवर शासनाने शाळा सिद्धी योजना सुरू केली. शैक्षणिकदृष्ट्या आणि सोयी-सुविधांच्या बाबतीत शाळांमधील एकंदरीत परिस्थिती समोर यावी, हा या योजनेमागील उद्देश आहे. शाळा सिद्धी योजनेंतर्गत प्राथमिक, माध्यमिक शासकीय शाळांसोबतच खासगी शाळांचेसुद्धा मूल्यांकन करण्यात आले. मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठीचे प्रसाधनगृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे का, विद्यार्थ्यांना बैठकीची व्यवस्था, इमारत सुसज्ज आहे का, प्रयोगशाळा, सांस्कृतिक सभागृह, खेळांसाठी क्रीडांगण, ग्रंथालय, विद्यार्थ्यांसाठी बससेवा आदी सुविधा आहेत का, याबाबत मूल्यांकन करून त्यासंबंधीचा अहवाल विद्या प्राधिकरणाला आॅनलाइन पाठविला होता. या अहवालानुसार विद्या प्राधिकरणाने जिल्ह्यातील शाळांचे पुनर्मूल्यांकन करून त्यांना ग्रेड दिले आहेत.
शाळा सिद्धी योजनेमध्ये १८२८ शाळांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी केवळ ८८ शाळांनीच ९० टक्के गुण प्राप्त करीत ए ग्रेड प्राप्त केला. १६९ शाळांनी ८९ टक्के गुण मिळवित बी ग्रेड मिळविला, तर ४७६ शाळांनी सी ग्रेड प्राप्त केला आणि ९६० शाळांनी डी ग्रेड प्राप्त केला.
शाळा सिद्धी उपक्रमांतर्गत शाळेतील भौतिक वातावरण, गुणवत्ता, सुविधा, उपलब्धता यावर मूल्यांकन करण्यात आले आणि त्याआधारे शाळांना गुण देण्यात आले. ‘ए ग्रेड’ प्राप्त करणाऱ्या शाळांना शाळा सिद्धीचे प्रमाणपत्र देण्यात येईल.
- प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद