सायन्स एक्स्प्रेस : रेल्वे सल्लागार समितीचा पुढाकार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 02:39 AM2017-07-21T02:39:45+5:302017-07-21T02:39:45+5:30
अकोला: देशभ्रमंतीवर निघालेल्या ‘सायन्स एक्स्प्रेस’ला अकोला रेल्वेस्थानकावर थांबविण्यासाठी मध्य रेल्वे सल्लागार समितीने पुढाकार घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: देशभ्रमंतीवर निघालेल्या ‘सायन्स एक्स्प्रेस’ला अकोला रेल्वेस्थानकावर थांबविण्यासाठी मध्य रेल्वे सल्लागार समितीने पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात लवकरच मध्य रेल्वेच्या विभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती समितीचे सदस्य बसंतकुमार बाछुका यांनी ‘लोकमत’ला दिली.
चालते-फिरते वैज्ञानिक प्रदर्शन घेऊन देशभ्रमंतीवर निघालेली ‘सायन्स एक्स्प्रेस’ महाराष्ट्रात दाखल झाली आहे. थांबा देण्यात आलेल्या देशभरातील प्रमुख रेल्वेस्थानकांच्या यादीमध्ये राज्यातील रत्नागिरी, मुंबई, नाशिक रोड, मूर्तिजापूर व नागपूर या रेल्वेस्थानकांचा समावेश आहे. या वैज्ञानिक रथातील प्रदर्शन पाहण्यासाठी उत्सुक रायगड जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षकांच्या आग्रहास्तव या गाडीला ‘लोकमत’च्या माध्यमातून रोहा या रेल्वेस्थानकावर थांबविण्यात आले होते.
‘सायन्स एक्स्प्रेस’च्या १६ वातानुकूलित डब्यांमध्ये भरविण्यात आलेले वैज्ञानिक प्रदर्शन पाहण्याकरिता अकोल्यासह बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, त्यांचे पालक व शिक्षक उत्सुक आहेत. रोह्याप्रमाणेच या गाडीला अकोला रेल्वेस्थानकावर थांबा देण्यात यावा, अशी मागणी तिन्ही जिल्ह्यातील जनसामान्यांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून उचलून धरली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेच्या सल्लागार समितीने पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात लवकरच समितीचे सदस्य मध्य रेल्वेच्या विभागीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती बसंतकुमार बाछुका यांनी ‘लोकमत’ला दिली.
राष्ट्रपती निवडणूक प्रक्रियेनिमित्त दिल्ली येथे मुक्कामी असलेले खासदार संजय धोत्रे यांनीसुद्धा केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे हा प्रस्ताव सादर करणार असल्याची ग्वाही दिली असल्याचे बाछुका यांनी बोलताना स्पष्ट केले. तर पश्चिम वैदर्भीयांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी कसोशीने पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही ‘विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्स’ व रेल्वे प्रवासी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.