सायन्स एक्स्प्रेस रोह्याला थांबली; मग अकोल्यात का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:40 AM2017-07-20T00:40:07+5:302017-07-20T00:40:07+5:30
तीन जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक नेतृत्वाने पुढे यावे
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: ‘लोकमत’च्या माध्यमातून करण्यात आलेल्या मागणीनुसार रेल्वे मंत्रालयाने १८ जुलै रोजी थांबा नसतानासुद्धा रायगड जिल्ह्यातील रोहा रेल्वे स्थानकावर ‘सायन्स एक्स्प्रेस’ थांबविली. जागतिक पर्यावरण बदलाचा संदेश देण्यासाठी देशभ्रमंतीवर निघालेल्या या वैज्ञानिक रथाला रोह्याप्रमाणेच विदर्भातील मॉडेल रेल्वेस्थानक म्हणून ओळख असलेल्या अकोला रेल्वेस्थानकावर थांबविण्याची मागणी जनसामान्यांतून होत आहे.
विज्ञान प्रसाराकरिता केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि विज्ञान मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायन्स एक्स्प्रेस’ हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. १६ वातानुकूलित डब्यांमध्ये वैज्ञानिक प्रदर्शन घेऊन निघालेल्या या विशेष गाडीला राज्यात केवळ रत्नागिरी, मुंबई, नाशिक रोड, मूर्तिजापूर आणि नागपूर या पाच रेल्वेस्थानकांवरच थांबा देण्यात आला आहे. चार दिवसांचा मुक्कामानंतर १७ जुलै रोजी रत्नागिरी रेल्वेस्थानकावरून निघालेल्या सायन्स एक्स्प्रेसमधील वैज्ञानिक प्रदर्शन पाहण्याची रायगडवासीयांची मनीषा ‘लोकमत’च्या माध्यमातून १८ जुलै रोजी पूर्ण झाली. पुढच्या प्रवासात ही गाडी १९ ते २२ जुलैदरम्यान मुंबई सीएसटी रेल्वेस्थानकावर, तर २४ ते २६ जुलैदरम्यान नाशिक रोड रेल्वेस्थानकावर थांबणार आहे. त्यानंतर २७ ते २९ जुलैदरम्यान ‘सायन्स एक्स्प्रेस’ला मूर्तिजापूर रेल्वेस्थानकावर थांबविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वीच्या प्रवासात ‘सायन्स एक्स्प्रेस’ला जलंब रेल्वेस्थानकावर थांबा देण्यात आला होता, तो यंदा वगळण्यात आला आहे. तर मॉडेल स्टेशन वगळून मूर्तिजापूरसारख्या तालुकास्तरीय रेल्वेस्थानकास प्राधान्य देण्यात आले आहे. ‘सायन्स एक्स्प्रेस’ रोह्याला थांबू शकते; मग अकोला अकोल्याला का नाही, असा प्रश्न ‘लोकमत’च्या माध्यमातून अकोल्यासह बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील विज्ञानप्रेमींनी उचलून धरला आहे.
अशी आहे सायन्स एक्स्प्रेस
१६ डब्यांच्या या ट्रेनमध्ये प्रत्येक डबा हा वातावरणातील बदलाची माहिती देणारा आहे. वातावरणातील बदलाची संकल्पना, बदलांचे परिणाम, जैवविविधता, पर्यावरण संरक्षण अशा बदलांची माहिती दिलेली आहे. ५ ते १0 वर्षांच्या मुलांसाठी किड्स झोन असून, त्यात गणित, विज्ञान व पर्यावरण अशा विविध विषयांचे रंजक व ज्ञानवर्धक खेळ उपलब्ध राहणार आहेत. तर १0 ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना ‘जॉय आॅफ सायन्स’ हा विशेष झोन न्याहाळता येणार आहे.