विज्ञान शिक्षकाच्या बोन सपोर्टर बाईक बेल्टला मिळाले पेटंट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:45 PM2018-12-29T12:45:16+5:302018-12-29T12:47:44+5:30
अकोट तालुक्यातील उमरा येथील लोकमान्य विद्यालयातील विज्ञान शिक्षक गजानन राजाराम चव्हाण यांनी संशोधन करून बोन सपोर्टर बाईक बेल्ट बनविला. या बेल्टला केंद्र शासनाकडून पेटंट मिळाले आहे.
- नितीन गव्हाळे
अकोला: रस्त्यावर दुचाकीस्वाराला खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागतो. खड्ड्यांमुळे दुचाकीस्वाराला कंबर, पाठदुखी, मणक्यांची झिजसारख्या आजारांसोबत स्पॉन्डीलायटीससारख्या आजाराला तोंड द्यावे लागते. या आजारातून दुचाकीस्वारांची सुटका व्हावी, या दृष्टिकोनातून दोन वर्षांपूर्वी अकोट तालुक्यातील उमरा येथील लोकमान्य विद्यालयातील विज्ञान शिक्षक गजानन राजाराम चव्हाण यांनी संशोधन करून बोन सपोर्टर बाईक बेल्ट बनविला. या बेल्टला केंद्र शासनाकडून पेटंट मिळाले आहे.
दुचाकी चालविताना चालकाच्या पाठीला, कंबर, मणक्यांना, मानेला झटके बसतात. त्यामुळे अनेकांना पाठदुखी, कंबरदुखी, स्पॉन्डीलायटीससारखे आजार झाले आहेत. रुग्णालयांमध्ये हाडांच्या आजारांनी ग्रस्त असलेले शेकडो रुग्ण आढळून येतात. अनेक रुग्णांवर शस्त्रक्रियासुद्धा कराव्या लागतात. त्यामुळे अस्थिरोग तज्ज्ञसुद्धा चालकांना दुचाकी चालविताना काळजी घेण्याचा किंवा दुचाकी न चालविण्याचा सल्ला देतात. दुचाकीचालकांना होणारा त्रास लक्षात घेऊन, त्यांची या त्रासातून मुक्तता करावी. या दृष्टिकोनातून गजानन चव्हाण या शिक्षकाने बोन सपोर्टर बाईक बेल्ट तयार केला. विज्ञान प्रदर्शनामध्ये या बेल्ट पाईकचे परीक्षकांनीसुद्धा कौतुक केले. डीआरडीओचे वैज्ञानिक डॉ. अशोक नगरकर यांनी त्यांनी या बेल्टला पेटंट मिळण्यासाठी अर्ज करण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यानुसार गजानन चव्हाण यांनी २0१७ मध्ये पेटंट मिळण्यासाठी केंद्र शासनाच्या पेटंट अॅप्लिकेशन पब्लिकेशनकडे आॅनलाइन अर्ज केला होता. त्यानुसार त्यांच्या अनोख्या बेल्टला पेटंट मिळाले आहे. पेटंट मिळाल्यामुळे त्यांच्या बाईक बेल्ट निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.