‘सध्याच्या विज्ञानापेक्षा उद्याचे विज्ञान अधिक प्रगत!’ - डॉ. नरेंद्र देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 12:32 PM2019-11-10T12:32:50+5:302019-11-10T12:32:56+5:30
विज्ञानाकडे जाण्याची गरज असल्याचे मत मुंबई होमी भाभा विज्ञान केंद्राचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नरेंद्र देशमुख यांनी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: विज्ञानामुळे प्रत्येक क्षेत्रात क्रांती झाली आहे. हे विज्ञानाचे शतक आहे. मोबाइल केवळ बोलण्याचे साधन होते; परंतु आता मोबाइल संगणकासारखेच काम करतो. भारताला सक्षम करण्यासाठी विज्ञानात प्रगती साधावी लागेल. समाजाची गरज लक्षात घेऊन संशोधन करावे लागेल. सध्याच्या विज्ञानापेक्षा उद्याचे विज्ञान अधिक प्रगत असणार आहे. त्यासाठी विज्ञानाकडे जाण्याची गरज असल्याचे मत मुंबई होमी भाभा विज्ञान केंद्राचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नरेंद्र देशमुख यांनी येथे केले.
प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर, शिक्षण उपसंचालक, माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि विज्ञान अध्यापक मंडळाच्यावतीने शनिवारी न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये आयोजित ४५ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन विभागीय कार्यशाळेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टाटा मोटर्सचे जनरल मॅनेजर डॉ. श्रीहरी मांडवगणे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, ‘हॅन्डस् आॅन अॅक्टिव्हिटी’चे प्रा. रवींद्र गोडबोले, अकोला एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भाऊसाहेब मांडवगणे व सचिव अमरावतीकर उपस्थित होते.
कार्यशाळेमध्ये ‘ट्रान्सफॉर्मेशन थ्रु इनोव्हेशन’ या विषयावर डॉ. श्रीहरी मांडवगणे यांनी जिज्ञासा, हिंमत, आत्मविश्वास, सातत्य, कृतिशीलता, ध्येय आणि ऊर्जा क्षमता या मूलमंत्राचा वापर केल्यास यश निश्चित मिळते, असे सांगितले. ‘बेसिक कन्सेप्टस् इन सायन्स’ या विषयावर प्रा. रवींद्र गोडबोले यांनी मार्गदर्शन केले. शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी समाजासमोरील समस्या डोळ्यासमोर ठेवून संशोधन करण्याची गरज आहे. त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यशाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनामध्ये दर्जेदार, प्रकल्प तयार करताना कोणकोणत्या प्रमुख बाबी विचारात घ्याव्या लागतात. इनवेशन आणि इनोव्हेशन यातला फरक, प्रतिकृती सादरीकरणाचे बारकावे आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान अध्यापक मंडळाचे विभाग अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र भास्कर यांनी केले. संचालक सुरेश किरतकर यांनी केले. अतिथींचा परिचय शिक्षिका इंगळे यांनी करून दिला.
आभार शशिकांत बांगर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका मेधा देशपांडे, सुनील वावगे, अनिल जोशी, विश्वास जढाळ, संतोष जाधव, मनीष निखाडे, धम्मदीप इंगळे, मुरलीधर थोरात, प्रमोद पांडे, आनंद पांडे व चंद्रकांत गव्हाणे यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)