भंगार शासकीय वाहनांचा लिलाव
By admin | Published: August 16, 2015 11:50 PM2015-08-16T23:50:09+5:302015-08-16T23:50:09+5:30
वित्त विभागाच्या शासकीय कार्यालयांना भंगार शासकीय वाहनांचा लिलाव करण्याच्या सुचना.
कारंजा (वाशिम) : विविध शासकीय कार्यालयांमध्ये पडून असलेली निरूपयोगी, भंगार, निर्लेखित वाहनांची विक्री चालू महिना संपण्यापूर्वी लिलावाद्वारे करण्याच्या सूचना वित्त विभागाने सर्व कार्यालय प्रमुखांना १३ ऑगस्ट रोजी दिल्या. निरुपयोगी, दुरुस्ती न होण्यासारखी अथवा अतिरिक्त असलेल्या शासकीय भांडार वस्तू, यंत्रसामग्री, तसेच वाहनांचा लिलाव करण्याच्या सूचना सर्व प्रशासकीय विभागांना देण्यात आल्या आहेत. लिलावातून जमा झालेली रक्कम शासकीय कोषागारात जमा करावी लागणार आहे. तत्पूर्वी, बंद पडलेल्या वाहनांचे निल्रेखन प्रमाणपत्र परिवहन विभागाकडून घ्यावे लागणार आहे.वाहनांची विक्री करण्याचे प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करताना, यापूर्वी निर्लेखित वाहनांपैकी किती वाहनांची विक्री करण्यात आली आणि त्यातून शासनाला किती निधी प्राप्त झाला, याबाबत सविस्तर माहितीही द्यावी लागणार आहे. तसे न केल्यास नवीन वाहनांच्या खरेदीच्या प्रस्तावांना मान्यता मिळणार नाही, असेही वित्त विभागाने स्पष्ट केले आहे.