चिमुकल्यांचा ‘स्क्रीन टाइम’ सर्वांगीण विकासासाठी घातक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 01:19 PM2019-07-21T13:19:45+5:302019-07-21T13:19:52+5:30
अकोला : बौद्धिक व शारीरिक विकासाच्या वयात चिमुकल्यांचा बहुतांश वेळ ‘मोबाइल स्क्रीन’वर जात आहे.
- प्रवीण खेते
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बौद्धिक व शारीरिक विकासाच्या वयात चिमुकल्यांचा बहुतांश वेळ ‘मोबाइल स्क्रीन’वर जात आहे. हा स्क्रीन टाइम चिमुकल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घातक ठरत असून, पालकांनी वेळीच सावध होण्याची गरज असल्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
माहिती तंत्रज्ञानाच्या जगतात हल्ली मोठ्यांपेक्षा जास्त चिमुकली मुले टेक्नोसॅव्ही असल्याचे कौतुक पालकांकडून केले जाते. मूल दोन अडीच वर्षाचे होत नाही, तोच त्याच्या हाती मोबाइल दिल्या जातो; मात्र काही काळाचे हे कौतुक मुलांवर दीर्घकालीन घातक परिणाम करत आहे याकडे पालकांचे दुर्लक्ष होत आहे. बौद्धिक अन् शारीरिक विकासाचे मूलभूत शिक्षण घेण्याचा बहुतांश वेळ स्क्रीन टाइमवर घालवल्याने त्यांच्या नैसर्गिक व्यक्तिमत्त्व विकासावर दुष्परिणाम होऊ लागला आहे. मूल जसजसे मोठे होऊ लागते, तसतशी त्याच्यातील आक्रमकता, एकाकीपणा यासारखी लक्षणे आढळू लागते.
त्याचा थेट परिणाम त्यांच्या शारीरिक विकासावर तसेच अभ्यासावरदेखील दिसून येतो. अशा परिस्थितीत पालकांनी वेळीच चिमुकल्यांना मोबाइलपासून दूर ठेवावे, असे आवाहन मनोविकार तज्ज्ञांनी केले.
काय म्हणतो डब्ल्यूएचओचा अहवाल?
जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसारस्क्रीन टाइम हा लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी धोकादायक ठरत आहे. यानुसार दोन महत्त्वाच्या बाबी डब्ल्यूएचओने स्पष्ट केल्याचे तज्ज्ञांनी सांगितले असून, ते याप्रमाणे.
० ते २ वर्ष वयोगटातील बालकांपुढे मोबाइल नेण्यास सक्तीने टाळा.
२ ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना एक तासापेक्षा कमी वेळेसाठी मोबाइल द्या; पण या वेळेतही काही काळ विश्रांतीची असावी.
पालकांनी हे करावे
- शक्यतो लहान मुलांच्या हाती मोबाइल देणे टाळा
- मोबाइल दिल्यास १५ ते ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ नको
- मुलांसोबत संवाद साधा, त्यांना वेळ द्या.
मूलभूत गोष्टी शिकण्याच्या वयात मुलांच्या हाती मोबाइल आला आहे. पालकांचा मुलांसोबतचा संवाद तुटल्याने त्यांच्या मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर घातक परिणाम होत आहे. कमी वयातच मुले आक्रमक होत असून, यावर पालकांनी नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
- डॉ. श्रीकांत वानखडे, मनोविकार तज्ज्ञ,
प्रेरणा प्रकल्प, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, अकोला.