स्क्रब टायफसची दहशत; आरोग्य यंत्रणा ‘हाय अलर्ट’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:40 PM2018-08-29T12:40:08+5:302018-08-29T12:45:48+5:30
अकोला : जिल्ह्यात कोठेही रुग्ण आढळल्याची सूचना मिळाल्यावर तीन तासांत त्या भागात जाऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश असल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ‘हाय अलर्ट’वर ठेवण्यात आली आहे
अकोला : शहरातील एका तरुणाला स्क्रब टायफस या कीटकजन्य आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतरआरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. जिल्ह्यात कोठेही रुग्ण आढळल्याची सूचना मिळाल्यावर तीन तासांत त्या भागात जाऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश असल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ‘हाय अलर्ट’वर ठेवण्यात आली आहे.
स्क्रब टायफस हा एक कीटकजन्य आजार असून, ‘चिगर माइट्स’ कीटकाच्या चावल्याने हा आजार होतो. या आजाराची लक्षणे चिकून गुनियासारखी असून, हा आजार जलद गतीने वाढणारा आहे. योग्य वेळात निदान झाले नाही, तर ४० ते ५० टक्के मृत्यूची शक्यता असते. नागपूर व गडचिरोली जिल्ह्यात पाच जणांचा बळी घेतल्यानंतर या आजाराची दहशत पसरली आहे. अकोल्यातील शिवाजी पार्क भागातील एका २८ वर्षीय तरुणाला या आजाराची लागण झाली असून, त्याच्यावर नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले. शहरात रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य विभाग कामाला लागला असून, शिवाजी पार्क या भागात घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले, तसेच फवारणी करण्यात आली.
‘त्या’ रुग्णाला सुटी
स्क्रब टायफसची लागण झाल्यानंतर नागपूर येथे उपचार घेत असलेल्या अकोल्यातील रुग्णाला मंगळवारी सुटी देण्यात आली. तो आणखी १५ दिवस नागपूरमध्येच राहणार असल्याचे समजले आहे.
आता अफवांचे पीक
स्क्रब टायफसचा रुग्ण आढळून आल्यानंतर आता शहरात अफवांचे पीक आले आहे. तापडिया नगर भागात दोन जणांना स्क्रब टायफस झाल्याची अफवा मंगळवारी पसरली. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ त्या भागात जाऊन सर्वेक्षण केले असता त्यांना साधा व्हायरल ताप असल्याचे समोर आले.
‘सर्वोपचार’मध्ये सज्जता
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात स्क्रब टायफसचा सामना करण्यासाठी सज्जता ठेवण्यात आली आहे. औषधशास्त्र विभागाचे डॉ. मुकुंद अष्टपुत्रे यांच्या नेतृत्वात चमू सज्ज असून, स्क्रब टायफसचे निदान कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.
स्क्रब टायफसचा संसर्ग वाढत असल्याने आरोग्य विभागाच्यावतीने राज्यभरातील आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणत्याही भागात रुग्ण आढळल्यास त्या ठिकाणी तीन तासांत पोहोचून उपाययोजना करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. त्यादृष्टीने आमची यंत्रणा सज्ज आहे.
- डॉ. अभिनव भुते, सहायक संचालक, आरोग्यसेवा (हि.) अकोला.