कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पारस गावच्या सीमा सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:20 AM2021-05-25T04:20:59+5:302021-05-25T04:20:59+5:30
गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. पारस गावात आतापर्यंत ...
गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. पारस गावात आतापर्यंत एकूण २७८ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना हाडोळे यांनी दिली असून त्यापैकी काहींचा मृत्यू झाला तर अनेक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या एकूण ७२ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. १६ मेपासून जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये बदल करण्यात आला असून दहा पॉझिटिव्ह रुग्णांच्यावर नोंद असलेल्या गावांचा रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने या गावातील सर्व आर्थिक व्यवहार, सर्वच प्रकारची दुकाने ३१ मेपर्यंत कायमस्वरूपी बंद राहतील. पारस गावचे सरपंच संतोष साठे यांनी गावातील नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करून तातडीने पावले उचलली. पारस गावच्या सीमा त्यांनी बंद केल्या आहेत. यामुळे बाहेरील कुठलीच व्यक्ती, वाहन पारस गावात येणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. उपसरपंच अर्शिया अंजुम मो. जफर, ग्राम विकास अधिकारी संजय डोंगरे, ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी सुद्धा पुढाकार घेतला आहे. गावात पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे.