महापौर पदासाठी अर्चना मसने यांच्या नावावर शिक्कामोर्तब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 10:47 AM2019-11-19T10:47:12+5:302019-11-19T10:47:19+5:30
अर्चना मसने यांनी महापौर पदासाठी तसेच प्रभाग क्र.६ मधील भाजप नगरसेवक राजेंद्र गिरी यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: महापौर पदाच्या पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने प्रभाग क्रमांक ५ च्या नगरसेविका अर्चना जयंत मसने यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सोमवारी महापालिकेत अर्चना मसने यांनी महापौर पदासाठी तसेच प्रभाग क्र.६ मधील भाजप नगरसेवक राजेंद्र गिरी यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले. काँग्रेसतर्फे महापौर पदासाठी प्रभाग क्र.१ मधील अजरा नसरीन मकसूद खान यांनी तर उपमहापौर पदासाठी प्रभाग २ मधील काँग्रेस नगरसेवक पराग कांबळे यांनी अर्ज सादर केला.
महापालिकेत विजय अग्रवाल यांच्या महापौर पदाचा अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे पुढील अडीच वर्षांच्या महापौर पदासाठी नुकतेच आरक्षण जाहीर झाले. अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गातील नगरसेविकेची निवड करण्यासाठी भाजपच्यावतीने सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता पक्ष कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. महापौरपदासाठी अर्चना मसने तसेच उपमहापौर पदासाठी राजेंद्र गिरी यांची निवड करण्यात आली. संबंधित दोन्ही उमेदवारांनी दुपारी मनपाचे प्रभारी नगरसचिव श्याम ठाकूर यांच्याकडे नामनिर्देशन पत्र सादर केले. याव्यतिरिक्त नगरसेविका अनुराधा नावकार, दीप मनवानी यांनीही नामनिर्देशन पत्र दिले. यावेळी महापौर विजय अग्रवाल, स्थायी समिती सभापती विनोद मापारी, महानगराध्यक्ष किशोर पाटील यांच्यासह भाजप नगरसेवक उपस्थित होते. काँग्रेस उमेदवारांनी अर्ज सादर करतेवेळी विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण, नगरसेवक डॉ. जिशान हुसेन यांच्यासह काँग्रेस नगरसेवक उपस्थित होते.
शुक्रवारी विशेष सभा
महापौर, उपमहापौर पदाच्या निवडीसाठी येत्या शुक्रवारी सकाळी ११ वाजता मनपाच्या मुख्य सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर कामकाज पाहतील.
काँग्रेसच्या खेळीकडे लक्ष
महापालिकेत एकूण ८० नगरसेवकांपैकी भाजपचे ४८ नगरसेवक आहेत. विरोधी पक्ष काँग्रेसचे १३ नगरसेवक असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५, भारिप-बमसंचे ३, एमआयएम-१ आणि दोन अपक्ष नगरसेवक आहेत. शिवसेनेचे ८ नगरसेवक आहेत. राज्यातील सत्तास्थापनेच्या घडामोडी लक्षात घेता महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र आल्यास त्यांचे संख्याबळ ३२ होणार आहे. अर्थात, भाजपचा महापौर होणार हे स्पष्ट असले तरी तो अविरोध होणार नाही, याकरिता काँग्रेसच्या खेळीकडे लक्ष लागले आहे.