प्रभाग पुनर्रचनेच्या अहवालावर शिक्कामोर्तब

By Admin | Published: September 24, 2016 03:12 AM2016-09-24T03:12:14+5:302016-09-24T03:12:14+5:30

राज्य निवडणूक आयोगाने दिली मान्यता.

Seal Recovery Review | प्रभाग पुनर्रचनेच्या अहवालावर शिक्कामोर्तब

प्रभाग पुनर्रचनेच्या अहवालावर शिक्कामोर्तब

googlenewsNext

अकोला, दि. २३- महापालिकेच्या बहुसदस्यीय प्रभाग पुनर्रचनेच्या अहवालावर राज्य निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले असून, १0 ऑक्टोबर रोजी पुनर्रचनेचा अहवाल प्रसिद्ध केला जाणार आहे. यंदा प्रथमच एका प्रभागातून चार नगरसेवकांना निवडून द्यावे लागणार असल्याने अकोलेकरांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
फेब्रुवारी २0१७ मध्ये पार पडणारी महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एक सदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार पार पडेल. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मनपाच्या स्तरावर प्रभागांची रचना करण्यात आली. यामध्ये जास्तीत जास्त २९ हजार ५४३ तर कमीत कमी २४ हजार लोकसंख्येचा निकष ठेवण्यात आला. प्रभाग पुनर्रचनेची ही जबाबदारी आयुक्त अजय लहाने यांनी उपायुक्त समाधान सोळंके यांच्याकडे सोपविली होती. मध्यंतरी निवडणूक आयोगाचे अधिकारी अतुल जाधव यांनी गूगल मॅपिंगद्वारे प्रभाग रचना करण्यासंदर्भात प्रशासनाला मार्गदर्शन केले होते. प्रभाग पुनर्रचनेच्या अहवालावर विभागीय आयुक्तांनी स्वाक्षरी केल्यानंतर सदर अहवाल अंतिम मंजुरीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला. या अहवालावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे.

असे राहील वेळापत्रक

प्रभाग रचनेची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे- १0 ऑक्टोबर
प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविणे- १0 ते २५ ऑक्टोबर
प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी- ४ नोव्हेंबर
हरकती व सूचना निवडणूक आयोगाकडे सादर करणे- १0 नोव्हेंबर
प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून निर्णय देणे -२२ नोव्हेंबर
प्रभाग रचनेची अधिसूचना व नकाशात योग्य तो बदल करून प्रभाग रचनेची अंतिम अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करणे- २५ नोव्हेंबर.


ऑक्टोबरमध्ये हरकती- सूचना
प्रभाग पुनर्रचनेच्या अहवालाला निवडणूक आयोगाने मंजुरी दिली. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार १0 ऑक्टोबर रोजी नागरिकांच्या हरकती व सूचनांसाठी प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध केला जाईल. त्यावर निवडणूक आयोगामार्फत सुनावणी होऊन हरकती व सूचना निकाली काढल्या जातील.

आधी आरक्षणाची सोडत नंतर..
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींचे आरक्षण निश्‍चित झाले आहे. ओबीसी महिला, पुरुष प्रवर्गाच्या आरक्षण सोडतची नोटीस ४ ऑक्टोबरपर्यंत प्रसिद्ध करून ७ ऑक्टोबरला सोडत काढली जाईल. त्यानंतर १0 ऑक्टोबरला प्रभाग पुनर्रचनेचा अहवाल प्रसिद्ध केला जाईल. यापूर्वी पार पडलेल्या मनपा निवडणुकीत आरक्षणाची सोडत व प्रभाग पुनर्रचनेचा अहवाल एकाच दिवशी प्रसिद्ध केला जात असे, हे येथे उल्लेखनीय.

Web Title: Seal Recovery Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.