अकोल्यातून अपहरण झालेल्या युवतीचा हरियाणात शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:14 AM2021-04-29T04:14:34+5:302021-04-29T04:14:34+5:30
दोन वर्षांपासून युवती होती बेपत्ता अकोला : सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेली एक युवती दोन वर्षांपूर्वी बेपत्ता ...
दोन वर्षांपासून युवती होती बेपत्ता
अकोला : सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेली एक युवती दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झाल्यानंतर याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. युवतीचा शोध लागत नसताना पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या संकल्पनेतून स्थापन करण्यात आलेल्या अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने या युवतीचा शोध घेत तिला हरियाणातील गुरुग्राम येथून अकोल्यात आणले. त्यानंतर या युवतीला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. या कक्षाची ही आतापर्यंतची मोठी कारवाई असल्याची माहिती समोर आली आहे.
सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका युवतीचे दोन वर्षांपूर्वी अपहरण झाले होते. याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ३६३, ३६६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला; मात्र अपहृत युवतीची कोणतीही माहिती मिळत नसल्याने पोलीस हतबल झाले होते. परंतु पोलीस अधीक्षक जी श्रीधर आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनात अकोल्यात नव्याने अनैतिक मानवी वाहतूक कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाकडून अपहरण झालेल्या युवती व मुलींचा तसेच महिलांचा शोध घेण्यात येत आहे. या कक्षाने युवतीचा शोध सुरू केला असता ही युवती हरियाणातील गुरुग्राम येथे असल्याची माहिती त्यांना मिळाली. या माहितीवरून कक्षाचे एक पथक हरियाणात दाखल झाले. त्यांनी तिला समजावून सांगत सर्व माहिती दिली. तसेच कुटुंबीयांशी बोलणी करून दिल्यानंतर या युवतीला गुरुग्राम येथून अकोल्यात आणले. सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात कुटुंबीयांची व युवतीची भेट घालून दिल्यानंतर युवतीला कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. अनैतिक मानवी कक्षाची ही मोठी कारवाई असून आतापर्यंत या कक्षाने सहा ते सात अपहृत मुलीची सुटका केली आहे. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचे प्रमुख संजीव राऊत, प्रीती ताठे, पोलीस निरीक्षक महेश गावंडे, सुलभा ढोले, विजय खर्चे, सुरज मंगरूळकर, संजय कोल्हटकर, पूनम बचे यांनी केली.