रेल्वे मालधक्क्यासाठी पर्यायी जागेचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 10:33 AM2020-07-10T10:33:20+5:302020-07-10T10:33:45+5:30

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी संयुक्तरीत्या अकोला व शिवणी येथील रेल्वे मालधक्क्याची पाहणी केली.

Search for an alternative site for railway freight | रेल्वे मालधक्क्यासाठी पर्यायी जागेचा शोध

रेल्वे मालधक्क्यासाठी पर्यायी जागेचा शोध

Next

अकोला : अकोलारेल्वे स्टेशन येथील मालधक््यावर माल चढ-उतार आणी ने-आण करताना रेल्वे व रस्ते वाहतुकीची कोंडी होत असते. त्यामुळे येथील वाहतूक नियमन अधिक सुकर व्हावे, यासाठी रेल्वे मालधक्यासाठी पर्यायी जागांची चाचपणी सुरू आहे, त्यासंदर्भात गुरुवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी संयुक्तरीत्या अकोला व शिवणी येथील रेल्वे मालधक्क्याची पाहणी केली.
रेल्वेस्थानकात दैनंदिन येणाऱ्या रॅकद्वारे किमान १,२०० ते १,३०० टन मालाची चढ-उतार केली जाते. हा माल उतरणे आणि वाहनांमध्ये भरण्यासाठी ४०० ते ५०० माथाडी कामगारही लागतात, तसेच माल इतर ठिकाणी पोहोचवण्यासाठी किमान ५० ते १०० ट्रकची ये-जा या ठिकाणी होते. शहरातील वर्दळीच्या भागात असलेल्या या मालधक्क्याचा सर्वांनाच त्रास होत आहे. ही बाब लक्षात घेता तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्हा दंडाधिकारी म्हणून आदेश पारित केला होता. त्यासाठी त्यांनी ५ जानेवारी २०१७ रोजी सर्वसंबंधितांची बैठक घेतली. त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे रेल्वे प्रशासनाला सातत्याने निर्देश देऊनही मालधक्का इतर ठिकाणी हलविला नसल्याने ३१ मार्च २०१९ पर्यंत अखेरची मुदत देण्यात आली. त्या मुदतीत कोणत्याही परिस्थितीत मालधक्का शहरातून हटवावा, असे निर्देश दिले. सोबतच रेल्वे मालधक्का कोणत्याही परिस्थितीत शहरात योग्य नाही, असेही मत नोंदवले. मालधक्का न हटविल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही आदेशात देण्यात आला; मात्र त्या आदेशालाही केराची टोपली दाखवत रेल्वेस्थानकातील मालधक्का सुरूच ठेवण्यात आला. विद्यमान जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी त्याच आदेशानुसार मालधक्का तत्काळ न हटवल्यास कारवाई करण्याचे बजावले होते, सोबतच पर्यायी जागांची चाचपणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सुयोग्य जागांची चाचपणी रेल्वे, महसूल व पोलीस प्रशासनाकडून संयुक्तरीत्या सुरू आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी जिल्हाधिकारी यांनी अकोला रेल्वे स्टेशनवरील मालधक्यांची पाहणी करून रेल्वे अधिकारी यांच्याशी पर्यायी जागेबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी शिवणी रेल्वे स्टेशन येथील जागेची व तेथे करावयाच्या आवश्यक उपाययोजनांबाबत पाहणी करण्यात आली.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, उपविभागीय अधिकारी नीलेश अपार, अकोला रेल्वे स्टेशन मॅनेजर ए.एस. नांदुरकर, मुख्य वाणिज्य विभागाचे यामीन अन्सारी, अकोला रेल्वे स्टेशन येथील मुख्य मालवाहतूक व्यवस्थापक एम.बी. निकम, तहसीलदार विजय लोखंडे आदी उपस्थित होते.

Web Title: Search for an alternative site for railway freight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.