बोरगाव वैराळे येथून पुर्णेच्या पात्रात वाहून गेलेल्या मृतदेहाचा शोध सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:23 AM2021-09-05T04:23:56+5:302021-09-05T04:23:56+5:30
अकोला : बाळापूर तालुक्यात बोरगाव वैराळे येथील पूर्णा नदीच्या पात्रातून वाहून गेलेल्या मृतदेहाचा शोध दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. ...
अकोला : बाळापूर तालुक्यात बोरगाव वैराळे येथील पूर्णा नदीच्या पात्रातून वाहून गेलेल्या मृतदेहाचा शोध दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. यासाठी पिंजर येथील मानवसेवा सामाजिक आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाकडून खिरोडा ते जिगाव, धुपेश्वरपासून ते मुक्ताईनगरपर्यंत तब्बल १२० कि.मी. शोधकार्य राबविले. शनिवार सायंकाळपर्यंत मृतदेह मिळून आला नसल्याची माहिती जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी दिली.
बाळापूर तालुक्यातील बोरगाव वैराळे परिसरातील पूर्णा नदीत मृतदेह वाहून गेल्याची माहिती मिळताच संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांनी तत्काळ सर्च ऑपरेशन राबविले. त्यांचे सहकारी मयूर सळेदार, ऋषीकेश राखोंडे, अंकुश सदाफळे, मयूर कळसकार, सुरज ठाकूर, नीलेश खंडारे, शिवम वानखडे, संकेत देशमुख यांचे रेस्क्यू बोटसह सर्च ऑपरेशन सुरू आहे. पथकाने दोन दिवसात तब्बल १२० कि.मी शोधकार्य राबविले. दरम्यान, शनिवार सायंकाळपर्यंत मृतदेह आढळून आला नसल्याची माहिती सदाफळे यांनी दिली. यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे, उरळ पोलीस स्टेशन ठाणेदार वडतकर आदी उपस्थित होते.
-------------------------
उरळ पोलिसांनी लावली होती जीवाची बाजी
बोरगाव वैराळे येथे पूर्णा नदीत मृतदेह असल्याची माहिती उरळ पोलिसांना मिळाली. त्यावरून हातरूण बीटचे अंमलदार विजय झाकर्डे व रघुनाथ नेमाडे यांनी बोरगाव वैराळे येथे जाऊन स्थानिकांच्या मदतीने अंधारात शोध घेतला. बॅटरीच्या साहाय्याने पाहणी केली असता एक कि.मी. अंतरावर मृतदेह दिसून आला. यावेळी पोलिसांनी जीवाची बाजी लावत मृतदेह काढण्याचा प्रयत्न केला, परंतु संततधार पाऊस सुरू असल्याने मृतदेह काढण्यास अडचण येत होती. पुन्हा पोलीस कर्मचाऱ्यांनी मृतदेह काढण्याचा प्रयत्न केला. नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढल्याने कर्मचाऱ्यांनी कसाबसा स्वत:चा जीव वाचविला; मात्र मृतदेह नदीपात्रात वाहून गेल्याचे उरळ पोलिसांकडून सांगण्यात आले.