अकोलेकरांची तहान भागविण्यासाठी शोध मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 01:01 AM2017-09-07T01:01:42+5:302017-09-07T01:01:48+5:30
अकोला : पावसाने दडी मारल्याने अकोलेकरांना यंदा तहान भागविणे कठीण होणार आहे. त्यासाठी, पर्यायी व्यवस्था म्हणून महापालिका अधिकार्यांनी आतापासूनच शोध मोहीम सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पावसाने दडी मारल्याने अकोलेकरांना यंदा तहान भागविणे कठीण होणार आहे. त्यासाठी, पर्यायी व्यवस्था म्हणून महापालिका अधिकार्यांनी आतापासूनच शोध मोहीम सुरू केली आहे.
वाशिम आणि धरणक्षेत्र परिसरात पाऊस नसल्याने अकोला महानगरावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. अकोला महानगराला पाणीपुरवठा करणार्या महानच्या धरणात आता १६ टक्के जलसाठा (मृतसाठा) शिल्लक राहिला आहे. जर परतीच्या पावसानेही कृपा केली नाही, तर अकोलेकरांना तहान भागविणे कठीण होणार आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्य़ात अकोलेकरांचे हाल होऊ नये, यासाठी आता पर्यायी व्यवस्था सुरू झाली आहे. मनपा आयुक्त अजय लहाने यांच्यासह अधिकार्यांचे एक पथक वानच्या धरणास भेट देऊन आलेत. वानच्या धरणातील पाणी गुरुत्वाकर्षणाच्या बळाने खाली आणून त्यानंतर पम्पिंगद्वारे अकोल्यास पाणीपुरवठा करण्याचा विचार सुरू आहे. अमृत योजनेतील २४ कोटींच्या निधीतून यासाठी खर्च करण्यापर्यंत यंत्रणा पोहोचली आहे.
वान धरणातील पाणी अकोल्यात आणण्याचे प्रयोग करण्यासाठी काय करावे, यावर आता उपाययोजना केली जात आहे. महापालिका आयुक्त, जलसंधारण अधिकारी, सिंचन अधिकारी, जलप्रदाय अभियंता यांचे पथक आता यासाठी लवकरच प्रयोग सुरू करणार असल्याचे बोलले जात आहे.