धान्य लाभासाठी पात्र लाभार्थींचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 02:20 PM2019-02-24T14:20:57+5:302019-02-24T14:21:05+5:30
अकोला: हजारो शिधापत्रिकाधारक कुटुंबांना शासकीय धान्याचा लाभ मिळण्याची प्रतीक्षा असताना नोव्हेंबर २०१८ मध्ये अकोला जिल्ह्यात केवळ २०५ कुटुंबांची संख्या निश्चित झाली.
अकोला: हजारो शिधापत्रिकाधारक कुटुंबांना शासकीय धान्याचा लाभ मिळण्याची प्रतीक्षा असताना नोव्हेंबर २०१८ मध्ये अकोला जिल्ह्यात केवळ २०५ कुटुंबांची संख्या निश्चित झाली. या अत्यल्प संख्येमुळे लाभार्थी वंचित असल्याने शासनाने १५ फेब्रुवारी २०१९ पर्यंत काढलेल्या नव्या शिधापत्रिकांपैकी पात्र लाभार्थींची निवड करण्याची तयारी सुरू केली आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ नुसार कुणीही भूकबळी जाऊ नये, यासाठी सार्वजनिक वितरण प्रणालीतून अन्न पुरवठ्याची हमी देण्यात आली आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने २०१३ मध्येच सार्वजनिक वितरण प्रणालीतून धान्य वाटपासाठी लाभार्थी संख्या निश्चित केली. अत्यल्प उत्पन्न, विधवा, परित्यक्ता, दुर्धर आजारी रुग्ण या प्रकारातील कुटुंबांना अंत्योदय गटात लाभ देण्याचे ठरले. ग्रामीण भागात ४४ हजार रुपये तर शहरी भागात ५९ हजार रुपये उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील सदस्यांना प्राधान्य गटात धान्याचे लाभार्थी ठरविण्यात आले. या लाभार्थी गटांची राज्यभरातील पात्र संख्येनुसार जिल्हानिहाय संख्या निश्चित करण्यात आली. त्यासाठी ३० सप्टेंबर २०१६ रोजी प्रत्यक्ष असलेल्या शिधापत्रिकांच्या संख्येतून कुटुंब व लाभार्थी संख्या ३ मार्च २०१७ रोजी शासनाने ठरवून दिली. लाभार्थी संख्येनुसार प्रत्येक जिल्ह्यात धान्याचा लाभ देण्यासाठी ग्रामसभा, स्वस्त धान्य दुकानदार स्तरावरून पात्र लाभार्थींची यादी तयार झाली. त्या यादीतूनही हजारो कुटुंबे धान्यापासून वंचित असल्याची ओरड आहे. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या लाभार्थी संख्येत बदल करण्याची वेळ आली.
- जिल्ह्यातील हजारो कुटुंबे वंचित!
अकोला जिल्ह्यासाठी शासनाने मार्च २०१७ मध्ये ठरवून दिलेल्या लाभार्थी संख्येत फारसा बदल झालेला नाही. त्यामुळे नव्याने लाभार्थी निश्चित करताना जिल्ह्यातील लाभार्थींच्या हाती भोपळाच मिळाला आहे. केवळ अंत्योदय कुटुंबांना लाभ देण्यासाठी २०५ एवढीच संख्या निश्चित झाली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात लाभार्थी वंचित असल्याने शासनाला पात्र शिधापत्रिकांसाठी मुदतवाढ द्यावी लागत आहे. त्यानुसार १५ फेब्रुवारीपर्यंतच्या काढलेल्या शिधापत्रिकाधारकांचा विचार केला जाणार आहे.
- पात्र शिधापत्रिकांची संख्या अनभिज्ञ
मार्च २०१७ मध्ये अकोला शहरी भागात अंत्योदय-४५९२ कुटुंबे, प्राधान्य गट-३७०२०४ लाभार्थी पात्र होते. ग्रामीण भागात अंत्योदय ३९०२४ कुटुंबे, प्राधान्य गट- ६८६५१० लाभार्थी होते. नव्याने लाभ देण्यासाठी केवळ अंत्योदय गटात २०५ कुटुंबे निवडण्यात आली. आता नव्याने निवड होणाऱ्यांमध्ये किती शिधापत्रिकाधारकांचा समावेश होईल, ही बाब लवकरच पुढे येणार आहे.