फूस लावून पळवून नेलेल्या युवतीचा घेतला शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:14 AM2021-06-05T04:14:25+5:302021-06-05T04:14:25+5:30
अकोला : हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंडाळा येथून एका युवतीस फूस लावून पळवून नेण्यात आले होते. या युवतीचा अनैतिक ...
अकोला : हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंडाळा येथून एका युवतीस फूस लावून पळवून नेण्यात आले होते. या युवतीचा अनैतिक मानवी वाहतूक कक्ष व स्थानिक गुन्हे शाखेतील मुस्कान पथकाने शोध घेऊन तिला परत आणले. या युवतीला हिवरखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील कारवाई हिवरखेड पोलिसांनी सुरू केली आहे.
खंडाळा येथील युवतीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तिच्या वडिलांनी हिवरखेड पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर हिवरखेड पोलिसांनी या युवतीचा शोध सुरू केला; मात्र त्यांना युवतीचा पत्ता लागला नाही. त्यामुळे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून स्थापन करण्यात आलेल्या अनैतिक मानवी वाहतूक कक्ष व स्थानिक गुन्हे शाखेतील मुस्कान पथकाने या युवतीचा शोध सुरू केला. त्यानंतर ही युवती बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक कक्षाला मिळाली. या माहितीवरून त्यांनी सापळा रचून युवतीस विश्वासात घेऊन तिला अकोल्यात आणले. आईवडिलांसोबत बोलणे करून दिल्यानंतर या युवतीला हिवरखेड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पुढील कारवाई हिवरखेड पोलिस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ, अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचे प्रमुख संजीव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रीती ताठे, सहायक पोलीस निरीक्षक महेश गावंडे, सुलभा ढोले, विजय खर्चे, सुरज मंगरूळकर, पूनम बचे व मुस्कान पथकाचे प्रवीण लाड, पूजा इंदोरे यांनी केली.