अकोला जिल्ह्यात कुपोषित बालकांचा शोध; आशा, अंगणवाडीसेविकांच्या गृहभेटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 01:28 PM2018-06-25T13:28:32+5:302018-06-25T13:33:34+5:30
अकोला : तीव्र कुपोषित बालकांच्या प्रकृतीमध्ये सुधारणेसाठी असलेला निधी खर्च करण्याचे अधिकार गावपातळीवर अंगणवाडीसेविकांना दिले जाणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यात तीव्र कुपोषित बालकांची शोध मोहीम राबवण्यात आली आहे.
अकोला : तीव्र कुपोषित बालकांच्या प्रकृतीमध्ये सुधारणेसाठी असलेला निधी खर्च करण्याचे अधिकार गावपातळीवर अंगणवाडीसेविकांना दिले जाणार आहेत. त्यासाठी अकोला जिल्ह्यात तीव्र कुपोषित बालकांची शोध मोहीम राबवण्यात आली आहे. त्यांना ग्राम बालविकास केंद्रात आहार व औषधोपचार दिला जाणार आहे.
पावसाळ््यात बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढते. काही प्रमाणात बालमृत्यूही वाढतात. ही बाब आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभागासाठी आव्हानात्मक ठरते. त्यातच जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक असल्याची चर्चा दरम्यानच्या काळात झाली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि महिला व बालकल्याण विभागाने ही बाब गांभीर्याने घेत उपाययोजनांची सुरुवात केली. राजमाता जिजाऊ मिशन अंतर्गत आरोग्य विभागाने नुकतेच आशा, अंगणवाडीसेविकांना प्रशिक्षण दिले. त्यानुसार जिल्ह्यात कुपोषित बालकांचा नव्याने शोध घेण्याचे बजावण्यात आले. गृहभेटीतून प्रत्येक बालकाचे वजन, उंची, दंडघेर, आरोग्यविषयक तक्रारींची माहिती घेण्यात आली. त्यातून पुढे आलेल्या माहितीनुसार गावपातळीवर ग्राम बालविकास केंद्र निश्चित केले जाईल. त्या केंद्रात तीव्र आणि मध्यम कुपोषित बालकांवर उपचार केले जातील. आहार व औषधीचा खर्च भागवण्यासाठी अंगणवाडी स्तरावरच व्हीसीडीसीचा निधी दिला जाणार आहे. अंगणवाडीसेविकांना तो खर्च करण्याचे अधिकारही देण्यात येतील. सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या निश्चित झाली आहे. किती गावांमध्ये ग्रामबालविकास केंद्र सुरू होतील, याचे नियोजन सोमवारी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या आयुक्त उद्या जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे संवाद साधणार आहेत.
जिल्हा स्त्री रुग्णालयातही कक्ष सुरू
जिल्ह्यातील अतितीव्र कुपोषित बालकांवर औषधोपचार करण्यासाठी जिल्हा स्त्री रुग्णालयातही बालविकास केंद्र कार्यरत आहे. या ठिकाणी माता व बालकांना पोषक आहार देणे, वजन वाढवणे, आरोग्य सुधारणेसाठी औषधोपचार केले जातात. आता गावपातळीवरच औषध आणि आहाराचा निधी दिला जाणार आहे.