मृग नक्षत्राचा दुसरा दिवसही कोरडा; पुढील दोन दिवसात पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 06:11 PM2020-06-08T18:11:53+5:302020-06-08T18:12:02+5:30
मृग नक्षत्राचा दुसरा दिवसही कोरडा गेला आहे.
अकोला : यावर्षी चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे; परंतु मृग नक्षत्राचा दुसरा दिवसही कोरडा गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, १० जून रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रविवारी नैर्ऋत्य मान्सून थोडा पुढे सरकला असून, कर्नाटकचा बराचसा अंतर्गत भाग, तामिळनाडू पाँडेचेरी, हसन, सेलम, कराईकलसिमोगा चित्तुर चेन्नई आदी भाग त्याने व्यापलेला आहे. मान्सून आणखी पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. आता तो कोकण गोवा, कर्नाटकचा आणखी काही भाग, संपूर्ण तामिळनाडू, रायलसीमा आणि किनारी आंध्र प्रदेश, मध्यवर्ती बंगालचा उपसागर आणि ईशान्य भारताचा काही भागात पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. लवकरच तो कोकणमधून पुढे सरकून दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे.
दरम्यान, पूर्व बंगालच्या उपसागरात ५.८ किमी उंचावर चक्राकार वारे वाहत असून, याच प्रभावाने पुढील २४ तासात एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. याची तीव्रता वाढून १० जून रोजी ठळक कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. या कमी दाब क्षेत्राचा प्रवास पश्चिम-उत्तर दिशेने होण्याची शक्यता आहे.
सध्या गुजरात वर ३.५ किमी उंचीवर आणि केरळ किणारपट्टीवर ५.८ किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ९ जून रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. १० जून रोजी विदर्भात विखुरलेला स्वरूपात काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून, पश्चिम विदर्भात पावसाचे प्रमाण कमी राहील. ११ जून रोजी विदर्भात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.