अकोला जिल्ह्यात १४०० पेक्षा जास्त लाभार्थींना लसीचा दुसरा डोस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 05:44 PM2021-02-27T17:44:21+5:302021-02-27T17:44:28+5:30
Corona Vaccine आतापर्यंत जवळपास १४०० पेक्षा जास्त लाभार्थींनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला.
अकोला: कोविड लसीकरण मोहीमेंतर्गत जिल्ह्यात आरोग्यसेवकांचा पहिला, तर फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत यातील १३ हजार ६०० पेक्षा जास्त लाभार्थींना कोविड लस देण्यात आली. यामध्ये दुसरी लस घेणारे लाभार्थींची संख्या १४०० पेक्षा जास्त आहे. जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहीमेला मोठ्या उत्साहत सुरूवात झाली होती, मात्र त्यानंतर रिॲक्शनच्या भीतीने अनेक लाभार्थींनी लस घेण्यास टाळले. मागील काही दिवसांपासून लस घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ होवू लागली. मागील आठ दिवसांपासून लसीचा दुसरा डोस देण्यास सुरुवात झाली. प्रारंभी अनेकांनी लसीचा दुसरा डोस घेणे टाळल्याचे दिसून आले. गत दोन ते तीन दिवसांपासून दुसरा डोस घेणाऱ्यांमध्येही उत्साह दिसू लागला. आतापर्यंत जवळपास १४०० पेक्षा जास्त लाभार्थींनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. आतापर्यंत जवळास १८ हजार लाभार्थ्यांची लसीकरणासाठी नोंदणी झाल्याची माहिती आहे. यामध्ये अनेकांच्या नावांची दोनदा नोंद झालेली आढळून येत आहे.
तरच रोगप्रतिकार शक्ती होईल तयार
जिल्ह्यात कोविडविरोधी लसीचा पहिला डोस घेतलेल्या अनेक लाभार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पहिला डोस घेतला म्हणजे कोरोना होणार नाही असा गैरसमज बाळगू नये. पहिल्या डोसनंतर महिनाभरात दुसरा डोस घेतल्यानंतर सुमारे पंधरवाड्यात रोगप्रतिकारक शक्ती तयार होते, असे तज्ज्ञ सांगतात.