तेल्हारा तालुक्यात होणार विदर्भातील दुसरा पॅगोडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:15 AM2021-07-20T04:15:02+5:302021-07-20T04:15:02+5:30

प्रशांत विखे तेल्हारा : विपश्यना चॅरिटेबल ट्रस्ट शेगावअंतर्गत खापरखेड फाटा येथील धम्म अनाकुला विपश्यना साधना केंद्रात रविवारी १८ जुलै ...

Second pagoda in Vidarbha to be held in Telhara taluka! | तेल्हारा तालुक्यात होणार विदर्भातील दुसरा पॅगोडा!

तेल्हारा तालुक्यात होणार विदर्भातील दुसरा पॅगोडा!

Next

प्रशांत विखे

तेल्हारा : विपश्यना चॅरिटेबल ट्रस्ट शेगावअंतर्गत खापरखेड फाटा येथील धम्म अनाकुला विपश्यना साधना केंद्रात रविवारी १८ जुलै रोजी स्तुप (पॅगोडा) निर्मितीसाठी भिक्षु संघाच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी अनेक जुन्या साधकांची उपस्थिती होती. हा पॅगोडा प्रथम नागपूर व त्यानंतर तेल्हारा तालुक्यात पूर्णत्वास जात आहे हे विशेष.

धम्मअनाकुला विपश्यना केंद्रांमध्ये सहा एकराच्या परिसरात दरमहा दहा दिवसीय दोन साधना शिबिर आयोजित करण्यात येत असतात; मात्र येथे पॅगोडा नव्हता. त्याकरिता येथील ट्रस्टी व जुन्या साधकांनी पुढाकार घेत पॅगोडा उभारण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी येथे ७ जुलै ते १८ जुलैपर्यंत भिक्षू संघासाठी दहा दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिर समापनानंतर भिक्षू संघाच्या हस्ते पॅगोडा निर्मितीसाठी भूमिपूजन करण्यात आले. याला अंदाजे दोन कोटी रुपयांवर खर्च अपेक्षित आहे. याकरिता जुन्या साधकांकडूच दानाच्या स्वरूपात आलेल्या निधीवरच हा पॅगोडा दोन वर्षात पूर्णत्वास नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. (फोटो)

-----------------------

एकाच वेळी १०४ साधक करू शकतील साधना

पॅगोडामध्ये एकाच वेळी १०४ साधक साधना करू शकतील, तसेच पॅगोडा हा दुमजली असणार आहे. यापूर्वी अशा प्रकारचा पॅगोडा विदर्भात नागपूर येथील धम्मनाग विपश्यना केंद्र, माहूरझरी येथे असून, त्यानंतर तेल्हारा तालुक्यातच होत आहे. त्यामुळे विपश्यना साधकांसाठी ही आनंदाची बाब असून, तालुक्याच्या सौंदर्यात निश्चितच भर पडणार आहे.

Web Title: Second pagoda in Vidarbha to be held in Telhara taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.