महिनाभरात वाढले माध्यमिकचे विद्यार्थी; एकाही विद्यार्थ्याला कोरोनाची लागण नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:55 AM2021-01-08T04:55:44+5:302021-01-08T04:55:44+5:30
अकाेला : कोरोनाची परिस्थिती काही प्रमाणात अटाेक्यात आल्यानंतर राज्यभरातील शाळांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्ग सुरू करण्यात आले ...
अकाेला : कोरोनाची परिस्थिती काही प्रमाणात अटाेक्यात आल्यानंतर राज्यभरातील शाळांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्ग सुरू करण्यात आले हाेते.
जिल्ह्यात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. आता या शाळांमध्ये गेल्या महिनाभरात विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढताना दिसत आहे. २३ नाेव्हेंबर राेजी आठ हजार ६८६ विद्यार्थी शाळेत आले हाेते. त्यामध्ये वाढ झाली असून, साेमवारी हीच संख्या नऊ हजार ३३२ एवढी झाल्याचे शिक्षण विभागाच्या आकडेवारीवरून दिसते.
जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंत एक लाख सहा हजार १७१ विद्यार्थी असून, २३ नोव्हेंबर या शाळेच्या पहिल्या दिवशी आठ हजार ६८६ विद्यार्थी शाळेत आले होते. हळूहळू ही संख्या वाढण्याची अपेक्षा होती. ती फलद्रूप हाेताना दिसत आहे. पालकांमधील काेराेनाची भीती कमी हाेत असून, शाळांनीही काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांची प्रभावी अमंलबजावणी सुरू केल्याचे प्रत्यंतर या निमित्ताने आले आहे.
कोरोना प्रतिबंधक उपाय प्रभावी
काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांबाबत शाळांमार्फत पुरेशी काळजी घेतली जात असल्याने एकाही विद्यार्थ्याला कोरोनाची लागण न झाल्याची दिलासादायक बाब पुढे आली आहे. वर्गात बसतानाही सोशल डिस्टन्सचे होणारे पालन, सॅनिटायझरचा वापर, ५०-५० टक्के उपस्थितीचा फाॅर्म्युला त्यासाठी उपयुक्त ठरला.
शाळेतील उपस्थितीसुद्धा हळूहळू वाढत आहे. विशेषत: दहाव्या वर्गाचे विद्यार्थी जवळपास ९० टक्के उपस्थित राहात आहे. महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष असल्यामुळे पालकही विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यावर भर देत आहे. शाळेत येणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झालेली नाही. ही चांगली बाब असून, शाळांनीसुद्धा याेग्य ती खबरदारी घेतली आहे.
- वैशाली ठग, शिक्षणाधिकारी माध्यमिक, जि.प., अकाेला