स्वप्न बघा, परिश्रम करा, यश नक्कीच मिळेल!
By admin | Published: July 6, 2015 01:23 AM2015-07-06T01:23:38+5:302015-07-06T01:23:38+5:30
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात जिल्हाधिका-यांचा विद्यार्थ्यांंना सल्ला.
अकोला: जीवनात मोठे होण्याचे ध्येय ठेवून, मोठी स्वप्न बघा, त्यासाठी परिश्रम केल्यास यश नक्कीच मिळेल, असा सल्ला जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी रविवारी विद्यार्थ्यांंना दिला. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांंसाठी जिल्हा प्रशासनामार्फत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालया तील छत्रपती सभागृहात आयोजित पहिल्या मार्गदर्शन कार्यक्रमात जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी प्रामुख्याने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उप विभागीय अधिकारी संजय खडसे, उप जिल्हाधिकारी शरद पाटील, श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष भडांगे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील उपस्थित होते. जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी विद्यार्थ्यांंंना यूपीएससी, एमपीएससी यासारख्या स्पर्धा परीक्षेसंबंधी मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेबाबत योग्य वेळी, योग्य पद्धतीने मार्गदर्शन मिळाल्यास, जिल्ह्यातील गरीब आणि शेतकरी कुटुंबांमधील विद्यार्थी निश्चितच सनदी अधिकारी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जीवनात मोठे ध्येय बाळगून प्रत्येक विद्यार्थ्याने आयएएस, आयपीएस, उपजिल्हाधिकारी असे सनदी अधिकारी होण्याचा संकल्प करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मोठी स्वप्ने बघा, स्वप्न पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले परिश्रम घेतल्यास अपेक्षित यश निश्चितच मिळणार आहे. स्पर्धा परीक्षांद्वारे मोठे अधिकारी होऊन समाजासाठी काहीतरी चांगले करून दाखविण्याचे आवाहनही जिल्हाधिकार्यांनी यावेळी विद्यार्थ्यांंना केले. या मार्गदर्शन कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांंंना विविध विभागांतर्गत रिक्त जागांची माहिती देण्यात आली. तसेच प्रश्नोत्तरे आणि विद्यार्थ्यांंंच्या अडचणींचे निरसनही करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी तथा कार्यक्रम समन्वयक शरद पाटील यांनी, तर संचालन प्रकाश अंधारे यांनी केले. मार्गदर्शन कार्यक्रमाला जिल्ह्यातील विद्यार्थी उपस्थित होते.