आकाशात पाहा पावसाळ्यातील दिवाळी; १२ व १३ ऑगस्टला दिसणार प्रकाशोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 09:34 AM2023-08-10T09:34:07+5:302023-08-10T09:34:24+5:30
अवकाशात येऊन गेलेले धुमकेतू, लघुग्रह आदींचे तुकडे पृथ्वीकडे गुरुत्वाकर्षणामुळे खेचल्याने वातावरणात पेट घेतात, अशा उल्का अधून मधून आकाशातून पृथ्वीवर येताना दिसतात.
लाेकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अवकाशात पूर्व क्षितिजावर नयनरम्य खगोलीय घटना घडणार आहे. पूर्व क्षितिजावर उल्का वर्षाव होणार असून, अवकाशप्रेमींसाठी ही पावसाळ्यातील दिवाळीच ठरणार असल्याची माहिती, ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी दिली.
अवकाशात येऊन गेलेले धुमकेतू, लघुग्रह आदींचे तुकडे पृथ्वीकडे गुरुत्वाकर्षणामुळे खेचल्याने वातावरणात पेट घेतात, अशा उल्का अधून मधून आकाशातून पृथ्वीवर येताना दिसतात. उल्कांची कक्षा आणि पृथ्वीची कक्षा निश्चित असल्यामुळे वर्षातील ठराविक वेळी ठराविक तारका समूहातून काही उल्का अधिक प्रमाणात पडताना दिसतात.
१२ व १३ ऑगस्टला आकाशात विविधरंगी रोषणाई स्विफ्ट टटल या धुमकेतूंच्या अवशेषातून बघता येईल. हा विविधरंगी प्रकाश उत्सव मध्यरात्रीनंतर पूर्व क्षितिजावर ययाती या तारका समूहातून आरंभ होईल. याचवेळी गुरु ग्रह आकाश मध्याशी सोबतीला असेल.
ताशी ६० ते १०० उल्कांचे दर्शन
nसर्वसाधारण दर ताशी ६० ते १०० या प्रमाणात उल्का तुटताना दिसतील. जसजशी रात्र संपायला लागेल तसतसा उल्का वर्षावाचा वेग वाढता असेल.
nहा नयनरम्य नजारा अंधाऱ्या भागातून झोपलेल्या स्थितीत ययातीकडे नजर ठेवून नुसत्या डोळ्यांनी पाहता येईल.