अकोला जिल्ह्यात वनवृध्दीसाठी हेलिकॉप्टरमधून करणार बियांचा वर्षाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 02:31 PM2018-04-20T14:31:13+5:302018-04-20T14:31:13+5:30
अकोला : माजी खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून यावर्षी जिल्ह्यात विविध ठिकाणी हेलिकॉप्टरद्वारे विविध प्रकारच्या बियांचा वर्षाव करण्यात येणार आहे.
अकोला : दिवसेंदिवस जिल्हयातील जंगलाची वृक्षतोडीमुळे संख्या कमी होत आहे. जिल्हयाच्या एकूण क्षेत्राफळापैकी केवळ ७ टक्के भाग हा जंगलानी व्यापलेला आहे. पर्यावरणाचे संतुलन राखता यावे यासाठी वनाचे क्षेत्रफळ वाढविणे गरजेचे आहे. यासाठी माजी खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून यावर्षी जिल्ह्यात विविध ठिकाणी हेलिकॉप्टरद्वारे विविध प्रकारच्या बियांचा वर्षाव करण्यात येणार आहे.
याबाबतची आढावा बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या दालनात झाली. यावेळी माजी खासदार प्रकाश आंबेडकर , बाळापुरचे आमदार बळीराम सिरस्कार , उपविभागीय अधिकारी संजय खडसे , उपवनसंरक्षक अकोट विभागाचे गुरुप्रसाद, सामाजिक वनिकरण विभागाचे उपसंचालक विजय माने, जिल्हा कृषि अधिकारी ममदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
हेलीक्टॅप्टरमधुन बिज टाकण्याच्या प्रक्रीयेला सिड बॉम्बीग असे म्हणतात. जिल्हयात जुन महिण्याच्या अखेरीस किंवा एक- दोन पाऊस पडल्यानंतर सिड बॉम्बींग करण्यात येणार आहे. यासाठी अंजन, जामुन, आंबा, वड, पिंपळ, निंब, पेस, सिताफळ, बोर, आदी वृक्षाच्या बियांचा वापर करण्यात येणार आहे. तसेच यात विविध वृक्षाच्या बियांसोबत जनावरांसाठी लागणा-या खादय गवतांच्या बियांचाही वापर करण्यात येणार आहे. सिड बॉम्बींग पातूर येथुन मोर्णा नदीच्या उगमापासुन ते अकोला पर्यंत व अकोट, तेल्हारा भागात करण्यात येणार आहे.
या सर्व कामावर नियंत्रण जिल्हा प्रशासनाचे राहणार असुन, यासाठी लागणारा निधी जिल्हा परिषद तर्फे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी वनविभागातर्फे वनक्षेत्राची निवड करण्यात येणार आहे. तर यासाठी नोडल आॅफिसर म्हणुन सामाजीक वनिकरण विभागाची देखरेख राहणार आहे. हा अभिनव प्रयोग यशस्वी करण्यासाठी सर्व विभागाची समन्वय साधुन काम करावे अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.