बियाणे-खते दुकान तपासणीचा अहवालच नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2017 01:29 AM2017-06-07T01:29:45+5:302017-06-07T01:29:45+5:30
खरीप हंगामाचा प्रारंभ : भरारी पथकांचा कानाडोळा
संतोष येलकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बियाणे-खतांच्या विक्रीतील काळाबाजार रोखण्यासाठी दुकानांची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील सातही तालुका स्तरावर भरारी पथकांना देण्यात आले; मात्र एकाही भरारी पथकाचा तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याने, जिल्ह्यात बियाणे व खते दुकानांच्या तपासणीकडे भरारी पथकांचा कानाडोळा होत असल्याची बाब समोर येत आहे.
पावसाळा सुरू झाल्याच्या पृष्ठभूमीवर खरीप पेरण्यांची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली असून, पेरणीसाठी बियाणे आणि खतांची खरेदी सुरू करण्यात आली आहे. बियाणे व खतांच्या खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, तसेच बियाणे, खते आणि कीटकनाशकांच्या विक्रीत काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर गत मे महिन्यात कृषी विभागामार्फत भरारी पथके गठित करण्यात आली.
तालुका कृषी अधिकारी, पंचायत समित्यांचे कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व वजन-मापे विभागातील निरीक्षकांचा समावेश असलेल्या जिल्ह्यातील तालुका स्तरावरील भरारी पथकांनी बियाणे व खतांच्या दुकानांची तपासणी करून तपासणीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व जिल्हा परिषद कृषी विकास अधिकाऱ्यांनी गत महिन्यात दिले होते.
महिना उलटून गेला; मात्र जिल्ह्यातील एका तालुकास्तरीय भरारी पथकांकडून तपासणी अहवाल अद्याप जिल्हा परिषद कृषी विकास अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात बियाणे व खते दुकानांच्या तपासणीकडे भरारी पथकांचा कानाडोळा होत असल्याची बाब समोर येत आहे.
जिल्ह्यातील तालुकास्तरीय भरारी पथकांनी बियाणे, खते व कीटकनाशक दुकानांच्या केलेल्या तपासणीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
- हनुमंत ममदे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद.