पश्चिम विदर्भात बियाणे उगवणशक्तीच्या तक्रारीत घट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:20 AM2021-07-31T04:20:10+5:302021-07-31T04:20:10+5:30
अकोला : गतवर्षी खरीप हंगामात बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारींचा पाऊस पडला होता. यंदा मात्र आतापर्यंत केवळ ४७ शेतकऱ्यांच्या तक्रारी ...
अकोला : गतवर्षी खरीप हंगामात बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारींचा पाऊस पडला होता. यंदा मात्र आतापर्यंत केवळ ४७ शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या आहेत. यावर्षी बियाणांच्या उगवणशक्तीबाबत कुठलीही अडचण न आल्याने सोयाबीन चांगले बहरले आहे. पश्चिम विदर्भात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली जाते. यंदा १४ लाख ९९ हजार ५९० हेक्टर क्षेत्रात पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. यापैकी १४ लाख १४ हजार ९०५ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. दरवर्षी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होत आहे. मागील वर्षीचा खरीप हंगाम सोयाबीन बियाणांच्या उगवणशक्तीबाबत गाजला होता. बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन उगवलेच नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. यामध्ये खासगी कंपन्यांसह महाबीजच्या सोयाबीन बियाणांचा समावेश होता; परंतु यंदा सोयाबीन बियाणांच्या तक्रारींच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. पश्चिम विदर्भामध्ये केवळ ४७ तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीमुळे कृषी विभागाकडून वेळोवेळी जनजागृती करण्यात आली होती. तसेच शेतकऱ्यांनीही संपूर्ण माहिती घेऊन सोयाबीन बियाणांची उगवणशक्ती तपासली व कृषी विभागाच्या निर्देशानुसार पेरणी केली असल्याने हे सकारात्मक परिणाम दिसून आल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्हानिहाय तक्रारी
जिल्हा तक्रारी
बुलडाणा १०
अकोला ०९
वाशिम १९
अमरावती ०७
यवतमाळ ०२
तक्रारी निघाल्या निकाली!
यंदा पश्चिम विदर्भात ४७ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या सर्व तक्रारींची तपासणी करण्यात आली असून यातील ४३ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. यामध्ये काही ठिकाणी तक्रारी मागे घेण्यात आल्या आहेत. तर कुठे बियाणे पेरणी करताना खोल पडल्यामुळे उगवण झालेली नसल्याचे सांगण्यात आले.
खोल बियाणे पडणे, ७५-१०० मिमी पाऊस पडला नसल्यावरही पेरणी करणे हे सर्व तांत्रिक विषय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले. यावर्षी घरगुती बियाणे वापरासंदर्भात व पेरणी करण्याच्या पूर्वी उगवणशक्ती तपासावी, याबाबत शेतकऱ्यांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती केली. त्यामुळे यंदा अमरावती विभागात तक्रारी कमी आल्या आहेत.
- शंकर तोटावार, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग.