महाबीजच्या संपामुळे बियाण्यांची आवक ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:34 AM2020-12-12T04:34:57+5:302020-12-12T04:34:57+5:30

महाबीज अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी ९ डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे महाबीजचे दैनंदिन कामकाज प्रभावित झाले असून, खरीप ...

Seed inflow stops due to Mahabeej strike! | महाबीजच्या संपामुळे बियाण्यांची आवक ठप्प!

महाबीजच्या संपामुळे बियाण्यांची आवक ठप्प!

Next

महाबीज अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी ९ डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे महाबीजचे दैनंदिन कामकाज प्रभावित झाले असून, खरीप २०२१ हंगामासाठी लागणाऱ्या बियाण्यांची आवक ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे. खरीप हंगामासाठी लागणाऱ्या बियाण्यांच्या कच्च्या मालाची आवक साधारणत: १ डिसेंबरपासून सुरू होते. त्यानुसार राज्यातील विविध जिल्ह्यांतून बियाण्यांची आवकही सुरू झाली होती; परंतु ९ डिसेंबरपासून महाबीजचे कामकाज बंद असल्याने बियाण्यांची आवकही ठप्प झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही ठोस आश्वासन मिळाले नाही. दरम्यान, अकोल्याचे जिल्हाधिकारी तथा प्रभारी महाबीज व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र पापळकर यांनी गुरुवारी महाबीज कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली; मात्र ही चर्चा सकारात्मक झाली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे संप कायम राहणार असल्याचे कर्मचाऱ्यांचे मत आहे.

तर बियाणे प्रक्रियेला होणार उशीर

बेमुदत संपामुळे बियाण्यांच्या कच्च्या मालाची आवक ठप्प झाली आहे. दरवर्षी या कालावधीत साधारणत: ५ लाख क्विंटल बियाण्यांची आवक होते; परंतु संपामुळे ही आवक ठप्प पडली आहे. बियाणे स्वीकृतीसाठी २० डिसेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आल्याची माहिती आहे; मात्र हे आंदोलन असेच कायम राहिल्यास बियाणे पोहोचण्यास उशीर होऊन त्यावरील प्रक्रियेलाही उशीर होईल.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचेही साखळी उपोषण

महाबीजच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबतच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनीही विविध मागण्यांसाठी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. या साखळी उपोषणाचा शुक्रवारी दुसरा दिवस आहे.

Web Title: Seed inflow stops due to Mahabeej strike!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.