बियाण्यांचे भाव वधारले; शेतकरी हतबल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:15 AM2021-05-31T04:15:14+5:302021-05-31T04:15:14+5:30

संजय उमक मूर्तिजापूर : खरीप पीक पेरणीसाठी शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागला असला, तरी मशागत संथगतीने सुरू आहे. ...

Seed prices rose; Farmers are helpless! | बियाण्यांचे भाव वधारले; शेतकरी हतबल!

बियाण्यांचे भाव वधारले; शेतकरी हतबल!

googlenewsNext

संजय उमक

मूर्तिजापूर : खरीप पीक पेरणीसाठी शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागला असला, तरी मशागत संथगतीने सुरू आहे. पेरणीसाठी लागणारे बियाणे गतवर्षीच्या तुलनेत महागल्याने शेतकऱ्यांची कंबर मोडली आहे. पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाला असून, तालुक्यात सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, हे खरिपाचे मुख्य पीक असल्याने पेरणीसाठी लागणारे खते, बी- बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची ससेहोलपट होत आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक शासकीय योजना राबविण्यात येतात, शेतकऱ्यांना या योजनेतून आर्थिक फायदा व्हावा हाच उद्देश असतो; परंतु या योजनेतून मिळणारे महाबीज बियाणे अद्यापही नियोजन नसल्याने बियाणे बाजारात उपलब्धच नाही. शासकीय अन्न सुरक्षा व ग्राम कृषी उत्पादन योजनेंतर्गत तालुक्यात शेतकऱ्यांना रबी हंगामासाठी अनुदानित बियाणे वाटपाचा कार्यक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. योजनेतून केवळ महाबीज या नामांकित कंपनीचे अनुदानित बियाणे वाटप करण्यात येत आहे; परंतु महाबीजने आपले बियाणे अजूनही बाजारात उपलब्ध करून दिले नसल्याने इतर बियाणे कंपन्यांचे फावले आहे. अशा परिस्थितीत अवाच्या सव्वा दरात निकृष्ट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जात आहे. जे बियाणे खुल्या बाजारात ७ हजार ते ८ हजार रुपये क्विंटल भावाने उपलब्ध असताना प्रमाणित बियाण्याच्या नावाखाली हेच बियाणे ११ ते १२ हजार रुपये क्विंटल दराने उपलब्ध आहे. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी १००० ते १५०० रुपये जादा दराने शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रकार चालला असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे. महाबीजने अत्यल्प प्रमाणात बियाणे बाजारात उपलब्ध केल्याने बियाण्याचा तुटवडा पडला आहे. अनेक शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर उपलब्ध झाले नसल्याने पेरणीपूर्व मशागतीची कामे मंदावली आहेत. (फोटो)

--------------------

असे आहेत बियाण्याचे भाव

२०२०. २०२१

महाबीज - २२५० २२५०

अंकुर- २६००. ३३००

ईगल - २५००. ३३५०

करिश्मा - २५००. ३५००

सारस- १९५०. ३०००

विक्रांत- २४९०. ३४९०

ओसवाल - २१५०. ३२५०

--------------------

तूर, सोयाबीन क्षेत्र वाढणार!

ज्वारी, मूग नामशेष होण्याच्या मार्गावर

दरवर्षी तूर, सोयाबीन पेरणी क्षेत्र वाढत चालले असून, तेवढ्याच मोठ्या प्रमाणात ज्वारीचे क्षेत्र घटले आहे. गतवर्षीच्या तुलनेत ज्वारी व मूग पेरणी लक्षांक निम्म्याहून कमी झाला आहे. तूर, सोयाबीन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

-----------------------

७३ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन

७३ हजार ३०० हेक्टर क्षेत्रात खरीप पेरणीचा लक्षांक असून, सोयाबीन ४३ हजार ५०० हेक्टर, तूर ११ हजार ९०० हेक्टर, कपाशी १३ हजार ५०० हेक्टर, मूग २ हजार ५०० हेक्टर, उडीद १ हजार ६०० व ज्वारी ३०० हेक्टर लक्षांक आहे. उपरोक्त क्षेत्रावर, सोयाबीन ६ लाख १७ हजार ७०० क्विंटल, तूर ८६ हजार २५७ क्विंटल, मूग ८ हजार ६५० क्विंटल, कापूस ३७ हजार १२५ क्विंटल, उडीद ५ हजार ९२० क्विंटल व ज्वारी २ हजार १०० क्विंटल उत्पादन होणे अपेक्षित आहे.

---------------------------------------

शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बीज उगवण तपासणी व बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, महाडीबीटी पोर्टलवर अनुदानावरील बियाणांसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांचे ३ ते ४ दिवसांमध्ये लॉटरी पद्धतीने निवड होऊन, निवड यादी प्राप्त होताच याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

-सुहास बेंडे, तालुका कृषी अधिकारी, मूर्तिजापूर.

----------------------------------------

पेरणी तोंडावर येऊन ठेपली आहे. बियाण्यांचे वाढलेले दर, आवश्यक त्या बियाण्यांची व खतांची टंचाई, सोयाबीनचा नाकारलेला विमा, पीक कर्ज वाटपामध्ये बँकेच्या अडचणी असल्याने चालू हंगामामध्ये शेती करायची कशी, हा प्रश्न निर्माण झालेला आहे.

- पंचफुलाबाई नरहरी ठाकरे, शेतकरी, जमठी खुर्द.

Web Title: Seed prices rose; Farmers are helpless!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.