केवळ ३,१५५ शेतकऱ्यांच्या खात्यात बियाणे अनुदानाची रक्कम जमा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:18 AM2020-12-22T04:18:41+5:302020-12-22T04:18:41+5:30
जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर बीटी कपाशी बियाणे वाटप करण्याची योजना राबविण्यात येत आहे. ...
जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर बीटी कपाशी बियाणे वाटप करण्याची योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा परिषदमार्फत जिल्ह्यातील ९ हजार ६ लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून, निवड करण्यात आलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांनी खरेदी केलेल्या बीटी कपाशी बियाण्याची ९० टक्के रक्कम वाटप करण्याची प्रक्रिया कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आली. यावर्षीच्या हंगामातील कापूस शेतकऱ्यांच्या घरात आला असूनही, योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना कपाशी बियाणे अनुदानाची रक्कम वाटप करण्याची प्रक्रिया अद्याही पूर्ण करण्यात आली नाही. जिल्ह्यातील ९ हजार ६ लाभार्थी शेतकऱ्यांपैकी २१ डिसेंबरपर्यंत केवळ ३ हजार १५५ लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कपाशी बियाणे अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली असून, उर्वरित ५ हजार ८५१ लाभार्थी शेतकऱ्यांना अद्यापही बियाणे अनुदानाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बियाणे वाटप योजनेत अनुदानाच्या रकमेपासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना बियाणे अनुदानाची रक्कम मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कपाशी बियाणे वाटप योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या जिल्ह्यातील ९ हजार ६ लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बियाणे अनुदानाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. २१ डिसेंबरपर्यंत ३ हजार १५५ लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बियाणे अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे.
डाॅ.मुरली इंगळे
कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद.