वाण, काटेपुर्णा धरण परिसरात बसविणार भूकंपमापक यंत्र!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 10:08 AM2020-06-30T10:08:15+5:302020-06-30T10:08:23+5:30
कंपमापक यंत्र बसविण्याची कार्यवाही करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २९ जून रोजी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास दिला.
- संतोष येलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : भूकंपासंदर्भात अचूक नोंद घेण्यासाठी जिल्ह्यातील काटेपूर्णा आणि वान या दोन धरणांंच्या ठिकाणी भूकंपमापक यंत्र बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास आदेश दिला आहे. जिल्ह्यात दोन ठिकाणी भूकंपमापक यंत्र लावण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील भूकंपासंदर्भात घटनांची अचूक माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम २५, ३० व ३१ नुसार जिल्ह्यात विविध आपत्तीसंदर्भात पूर्वतयारी, प्रतिबंध करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास अधिकार आहेत. त्यानुसार भूकंप यासारख्या आपत्तीसंदर्भात अचूक माहिती प्राप्त होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील पाटबंधारे विभागांतर्गत बार्शीटाकळी तालुक्यातील काटेपूर्णा आणि तेल्हारा तालुक्यातील वान इत्यादी दोन धरणांच्या ठिकाणी भूकंपमापक यंत्र बसविण्याची कार्यवाही करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २९ जून रोजी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास दिला. त्यानुसार जिल्ह्यातील दोन धरणांच्या ठिकाणी पाटबंधारे विभागामार्फत दोन भूकंपमापक यंत्र बसविण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भूकंपासंदर्भात आपत्तीची अचूक माहिती प्राप्त होण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यातील काटेपूर्णा व वान या दोन धरणांच्या परिसरात भूकंपमापक यंत्र बसविण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास दिला आहे. जिल्ह्यात दोन ठिकाणी भूकंपमापक यंत्र बसविण्यात येणार असल्याने, भूकंपासंदर्भात अचूक माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
- संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला.