महापालिकेचा २ काेटींचा भूखंड बळकावला; प्रशासन झाेपेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:19 AM2021-05-13T04:19:03+5:302021-05-13T04:19:03+5:30
स्थानिक अकाेला कृषी उत्पन्न बाजार समितीसमाेर महापालिकेच्या मालकीचा ४ हजार चाैरस फुटांपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेला भूखंड अग्रवाल नामक इसमाने ...
स्थानिक अकाेला कृषी उत्पन्न बाजार समितीसमाेर महापालिकेच्या मालकीचा ४ हजार चाैरस फुटांपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेला भूखंड अग्रवाल नामक इसमाने लीजवर घेतल्याचे कागदाेपत्री दाखविले हाेते. त्यानंतर या जागेचे बनावट कागदपत्रे तयार करून उत्तर झाेनमधील एका काॅंग्रेस नगरसेविकेच्या पतीला विक्री करण्यात आली. बनावट खरेदी-विक्रीच्या आधारे भूमी अभिलेख विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या भूखंडाची नाेंद नगरसेविका पतीच्या नावाने करण्यात आली. जागेचा मालकी हक्क दाखविताना नियमबाह्यरीत्या फेरफार नाेंदी करण्यात आल्या. या गंभीर प्रकरणाची उत्तर झाेनमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचारी, तसेच नगररचना विभागाला इत्थंभूत माहिती असताना, या जागेकडे प्रशासनाकडून हाेणारा कानाडाेळा संशयास्पद ठरत आहे. प्रशासनाने ही जागा ताब्यात घेण्यासाठी काेणता ठाेस निर्णय घेतला, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
प्रभारी अधिकाऱ्यांची चैन
शहरात स्वमालकीच्या जागेवर अनधिकृत बांधकाम हाेत असल्याची असंख्य प्रकरणे असून, या प्रत्येक ठिकाणी नगररचना विभागातील प्रभारी अधिकारी व त्यांच्या मर्जीतील सदस्य पाेहाेचून खुलेआम खिसे गरम करीत आहेत. मनपाच्या मालकीचा भूखंड बळकावला जात असताना, या विभागाने साेईस्कर मौन साधले आहे.
आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष
सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत साेईसुविधा देण्यासाेबतच प्रशासनाची गाडी रुळावर आणण्याची मनपा आयुक्त निमा अराेरा यांची भूमिका आहे. प्रशासनाच्या मालकीची जागा घशात घातल्याची बाब उजेडात आल्यानंतर, आता निमा अराेरा काेणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.