औरंगाबादला नेण्यात येणारे गोमांस जप्त!
By Admin | Published: May 9, 2017 02:47 AM2017-05-09T02:47:45+5:302017-05-09T02:47:45+5:30
मालवाहू वाहनामधून वाहतूक; दोघे गजाआड
अकोला : अकोल्यातून औरंगाबादला नेण्यात येणारे ११.५0 क्विंटल गोमांस स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सोमवारी सकाळी दीपक चौकाजवळून जाणार्या मालवाहू वाहनातून जप्त केले. पोलिसांनी औरंगाबाद येथील दोघांना अटक केली. या घटनेवरून अकोला शहरातून इतर शहरांमध्ये गोमांसाची मोठय़ा प्रमाणात विक्री होत असल्याचे सिद्ध होते.
स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना दीपक चौकातील एका गेस्ट हाऊसजवळून गोमांस घेऊन एमएच २0 ईजी 0३६0 क्रमांकाचे मालवाहू वाहन जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी याठिकाणी पाळत ठेवून मालवाहू वाहन येताच, छापा घातला आणि मालवाहू वाहन पकडले.
वाहनाची तपासणी केल्यावर वाहनामध्ये २५0 लीटरच्या प्लास्टिकच्या ११ ड्रममध्ये बर्फासह ११ क्विंटल गोमांस दिसून आले. तसेच आणखी एका ड्रमध्ये ५0 किलो गोमांस भरलेले दिसून आले. गोमांस भरलेले ड्रम पोलिसांना दिसू नयेत, यासाठी आरोपींनी ड्रमच्यावर ताडपत्री टाकून त्यावर मिरची आणि भुसा भरलेले पोते ठेवलेले होते. जप्त केलेल्या गोमांसाची किंमत १ लाख २५ हजार आहे. तसेच पोलिसांनी मालवाहू सुद्धा जप्त करून औरंगाबाद येथील स्नेहनगर सिल्लोड येथे राहणारा राजू दशरथ कांबळे (२४), जामा मशिद, सिल्लोड येथे राहणारा शेख अहमद शेख रहिम (२५) यांना अटक केली.
दोघा आरोपींवर रामदासपेठ पोलीस ठाण्यामध्ये प्रमोद डोईफोडे यांच्या तक्रारीनुसार महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ कलम ५(ब) ८,९(अ) नुसार गुन्हा दाखल केला.
ही कारवाई अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे व त्यांच्या कर्मचार्यांनी केली.
आरोपी गोमांस अकोल्यातून औरंगाबादला नेत असल्याचा पोलिसांना संशय आहे. हे गोमांस त्यांनी कोणाकडून घेतले, याची चौकशी पोलीस करीत आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे नरेंद्र चर्हाटे, अजय नागरे, संतोष मेंढे, शेख हसन, रवी इरचे, संदीप कावडे, गोपाल पाटील यांनी केली.