शहरातील बेवारस, भंगार वाहनांची हाेणार जप्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:14 AM2021-07-18T04:14:23+5:302021-07-18T04:14:23+5:30
महापालिका क्षेत्रात उघड्यावर बेवारस तसेच भंगार अवस्थेत असलेल्या जुन्या वाहनांमुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडतात. यामध्ये चाेरीच्या वाहनांचाही समावेश असण्याची ...
महापालिका क्षेत्रात उघड्यावर बेवारस तसेच भंगार अवस्थेत असलेल्या जुन्या वाहनांमुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडतात. यामध्ये चाेरीच्या वाहनांचाही समावेश असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहनधारकांच्या निष्काळजीपणाला लगाम लावण्यासाठी नाेव्हेंबर २०२० मध्ये राज्य शासनाने अशी वाहने ताब्यात घेऊन त्यांची हर्रासी करण्यासाठी सात दिवसांची विशेष माेहीम राबवण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला जारी केले हाेते. या माेहिमेत आरटीओ तसेच शहर वाहतूक शाखा पाेलिसांची मदत घेण्याचे निर्देश हाेते. त्या अनुषंगाने मनपाने शहराच्या विविध भागांतील बेवारस तसेच भंगार अवस्थेत पडून असलेल्या चारचाकी वाहनांची जप्ती करण्याचा निर्णय घेत नाेटीस प्रसिद्ध केली आहे.
क्षेत्रीय कार्यालयाकडून ९० वाहनांचा शाेध
रस्त्यालगत अथवा काेणत्याही ठिकाणी उघड्यावर पडून असलेल्या वाहनांचा शाेध घेऊन त्यांची यादी तयार करण्याची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयाकडे साेपविण्यात आली हाेती. चारही क्षेत्रीय कार्यालयांच्या वतीने ९० वाहनांचा शाेध घेण्यात आला आहे.
आरटीओकडे साेपवली यादी
मनपाने वाहनांच्या नाेंदणीची जबाबदारी असलेल्या आरटीओ कार्यालयाकडे ९० वाहनांची यादी साेपवली. वाहनांची नाेंदणी काेणाच्या नावावर आहे, त्याची माहिती सादर करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. ही वाहने आरटीओने न हटविल्यास ती जप्त करण्याची कारवाई मनपा, आरटीओ व ट्रॅफिक पाेलिसांकडून संयुक्तरीत्या केली जाणार आहे.
मनपा करणार लिलाव
उघड्यावर भंगार अवस्थेत पडून असलेल्या अनेक चारचाकी वाहनांना क्रमांक नाहीत. अकाेटफैल, वाशिम बायपास राेड भागात अशी वाहने आढळून आली आहेत. ही सर्व वाहने मनपा जप्त करणार असून मालमत्ताधारकाने दंड जमा न केल्यास वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे.