पंचायत समित्यांमधील जुने साहित्य वाटप करण्यासाठी लाभार्थींची निवड करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:23 AM2021-09-05T04:23:01+5:302021-09-05T04:23:01+5:30
अकोला : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत सेस फंडातून पाच वर्षांपूर्वी राबविण्यात आलेल्या विविध योजनांतर्गत जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या स्तरावर पडून ...
अकोला : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत सेस फंडातून पाच वर्षांपूर्वी राबविण्यात आलेल्या विविध योजनांतर्गत जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या स्तरावर पडून असलेले शिल्लक साहित्य वाटप करण्यासाठी योजनानिहाय लाभार्थींची निवड तातडीने करण्याचा ठराव जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत शुक्रवारी मंजूर करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या २० टक्के सेस फंडातून समाजकल्याण विभागामार्फत पाच वर्षांपूर्वी राबविण्यात आलेल्या विविध साहित्य वाटपाच्या योजनांमधील शिल्लक असलेले जुने साहित्य जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या स्तरावर गेल्या पाच वर्षांपासून पडून आहे. पंचायत समित्यांच्या स्तरावर पडून असलेले जुने साहित्य वाटप करण्यासाठी योजनानिहाय लाभार्थींची निवड करण्याच्या विषयाला सभेत मंजुरी देण्यात आली. तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे योजनेंतर्गत जिल्ह्यातील कामांच्या नियोजनावर सभेत चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या सभेला समितीचे सदस्य आणि समाजकल्याण अधिकारी पुंड उपस्थित होते.
रिक्त पदांवर कर्मचारी द्या;
समितीचे ‘सीईओं’ना साकडे !
जिल्हा परिषद समाजकल्याण विभागात कर्मचाऱ्यांची सहा पदे रिक्त असल्याने, योजनांच्या अंमलबजावणीसह प्रशासकीय कामकाजात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे समाजकल्याण विभागातील रिक्त पदांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट यांच्यासह समाजकल्याण समितीचे सदस्य डाॅ. प्रशांत अढाऊ, आम्रपाली खंडारे, नीता गवई, संदीप सरदार, आदी सदस्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौरभ कटियार यांच्याकडे केली. त्यानुषंगाने जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातील रिक्त पदांवर दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी समाजकल्याण समितीच्या सदस्यांना यावेळी दिली.
..................फोटो....................