मनपा स्थायी समितीसाठी १० सदस्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:45 PM2019-02-23T12:45:49+5:302019-02-23T12:45:57+5:30
अकोला: महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समितीमध्ये दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या आठ सदस्यांसह आणखी दोन सदस्य शुक्रवारी पायउतार झाले. त्यांच्या जागेवर नवीन १० सदस्यांची निवड करण्यात आली.
अकोला: महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समितीमध्ये दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या आठ सदस्यांसह आणखी दोन सदस्य शुक्रवारी पायउतार झाले. त्यांच्या जागेवर नवीन १० सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये भाजपचे पाच, काँग्रेस व शिवसेनेमधून प्रत्येकी दोन व राष्ट्रवादीप्रणित लोकशाही आघाडीतील एका सदस्याचा समावेश आहे.
येत्या २८ फेब्रुवारी रोजी मनपाच्या स्थायी समितीमधील १६ पैकी आठ सदस्यांना दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होत असल्याने संबंधित सदस्यांना पदावरून निवृत्त व्हावे लागले. यामध्ये सत्तापक्ष भाजपमधील पाच सदस्यांचा समावेश होता. उर्वरित तीन सदस्यांमध्ये काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित लोकशाही आघाडीतील नगरसेवकांचा समावेश आहे. निवृत्त झालेल्या सदस्यांच्या जागेवर नवीन आठ सदस्यांची निवड करण्यासाठी शुक्रवारी दुपारी मनपात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी शिवसेनेच्या मंजूषा शेळके व काँग्रेसचे इरफान खान यांनी राजीनामा दिल्यामुळे एकूण १० सदस्यांची निवड करण्यात आली.
यांची झाली निवड!
भाजप- राहुल देशमुख, अनिता चौधरी, दीपाली जगताप, माधुरी मेश्राम, हरीश काळे.
शिवसेना- मंगेश काळे, गजानन चव्हाण (एक वर्षासाठी)
काँग्रेस- फिरोज खान, जैनबबी शेख इब्राहिम (एक वर्षासाठी)
राष्ट्रवादी- फैयाज खान (एक वर्षासाठी)
यांचा कार्यकाळ संपुष्टात!
विद्यमान स्थायी समितीमधून सभापती विशाल इंगळे, बाळ टाले, सुनील क्षीरसागर, सुजाता अहिर, पल्लवी मोरे, शिवसेनेच्या सपना नवले, काँग्रेसच्या शाहीन अंजुम मेहबुब खान व राकाँप्रणित लोकशाही आघाडीच्या उषा विरक यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला.
सभापती पदाकडे लक्ष
स्थायी समितीचे विद्यमान सभापती विशाल इंगळे यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांना निवृत्त व्हावे लागले. त्यामुळे स्थायी समितीचे सभापती पद रिक्त झाले आहे. सभापती पदासाठी भाजपमधून नेमकी कोणाची वर्णी लागते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.