अकोला जिल्हा परिषदेच्या योजनांसाठी लाभार्थी निवड गुरुवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 02:11 PM2019-07-31T14:11:02+5:302019-07-31T14:11:10+5:30
अकोला: जिल्हा परिषदेच्या उपकरातून विविध विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांसाठी प्राप्त अर्जांच्या छाननीतून पात्र अर्जदारांची यादी जिल्हा परिषद इमारतीच्या भिंतीवर मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली.
अकोला: जिल्हा परिषदेच्या उपकरातून विविध विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांसाठी प्राप्त अर्जांच्या छाननीतून पात्र अर्जदारांची यादी जिल्हा परिषद इमारतीच्या भिंतीवर मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. गुरुवारी लकी ड्रा पद्धतीने लाभार्थी निवड होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, कृषी विभागाकडे असलेल्या ५७ लाख ५० हजारांच्या निधीतून लाभ मिळण्यासाठी तब्बल ४,२७३ अर्ज प्राप्त झाले आहेत. ही संख्या प्रचंड असल्याने लाभार्थी निवडीसाठी लकी ड्रा काढला जाणार आहे. त्याचवेळी इतर विभागाच्या योजनांसाठी आवश्यक तेवढे अर्ज प्राप्त नसल्याचीही माहिती आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची प्रक्रिया आणि वेळापत्रकही ठरवून त्यानुसार प्रशासकीय स्तरावर मंजुरीपर्यंतची प्रक्रिया वेळेतच पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी विविध विभागांसह पंचायत समित्यांना दिले. त्यानुसार लाभार्थींकडून अर्ज मागवण्यात आले. ग्रामपंचायत, पंचायत समिती स्तरावर सर्वच विभागातील योजनांचे अर्ज स्वीकारण्यात आले. पात्र, अपात्र अर्जांची यादी तयार झाली. त्यापैकी पात्र अर्जांची यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या सेसफंडातून विविध विभागाच्या योजनांसाठी निधी देण्यात आला. त्यातून योजना राबवल्या जाणार आहेत.
पात्र लाभार्थींची तालुकानिहाय संख्या
त्यामध्ये महिला व बालकल्याण विभागाच्या शिलाई मशीनसाठी अकोला-१५३, अकोट-७०, तेल्हारा-४५, बाळापूर-७०, पातूर-४४, बार्शीटाकळी-७२, मूर्तिजापूर-१०४, शेळीगटासाठी अकोला-१०६, तेल्हारा-१३३, पातूर-१६, बार्शीटाकळी-११, बाळापूर-६, अकोट-३४, मूर्तिजापूर-२८ अर्ज पात्र ठरले आहेत. गोठा बांधणीसाठी तेल्हारा-२, मूर्तिजापूर-५, बाळापूर-२, अकोट-२०, अकोला-९ पात्र ठरले. बोकूड वाटपासाठी अकोट-१, बाळापूर-२, तेल्हारा-१, अकोला-३ अर्ज पात्र ठरले आहेत.
कृषी विभागाच्या योजनांसाठी गर्दी
कृषी विभागाकडे शेतीपयोगी साहित्य वाटपाच्या योजना आहेत. त्या योजनांसाठी अर्ज करणारांची गर्दी झाली आहे. त्यामध्ये डीझल पंप पाच एचपीसाठी २६४, ओपनवेल सबमर्सिबल पंप-५५९, पाच एचपी सबमर्सिबल-१८७, प्लास्टिक ताडपत्री-३६८, प्लास्टिक ताडपत्री-१८९९, एचडीपीई पाईप-६५२, स्पायरल सेपरेटर-३४४ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातून निवड करण्यासाठी लकी ड्रा काढला जाण्याची शक्यता आहे.