सत्ताधारी-विरोधकांच्या सहमतीनंतर समित्यांवर सदस्यांची निवड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 02:12 PM2020-02-12T14:12:36+5:302020-02-12T14:12:50+5:30
गटनेत्यांच्या बैठकीत विषय समित्यांवर पक्षनिहाय जिल्हा परिषद सदस्यांची निवड करण्याच्या मुद्द्यावर सहमती झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा परिषदेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सहमतीनंतर विविध १० विषय समित्यांवर सदस्यांची मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बिनविरोध निवड करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित उपाध्यक्ष व विषय समित्यांच्या सभापतींना विषय समित्यांचे खाते वाटप आणि जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीसह विविध १० विषय समित्यांच्या ८३ सदस्य पदांवर जिल्हा परिषद सदस्यांची निवड करण्यासाठी ११ फेबु्रवारी रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. विषय समित्यांवर सदस्यांची निवड करण्यासाठी समितीनिहाय सदस्यांकडून अर्ज दाखल करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेतील सत्ताधारी भारिप बहुजन महासंघ आणि शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस इत्यादी विरोधी पक्षांच्या सहमतीनंतर १० विषय समित्यांवर जिल्हा परिषदेच्या सदस्यांची निवड करण्यात आली. स्थायी समितीसह जलव्यवस्थापन व स्वच्छता, कृषी, समाजकल्याण, शिक्षण व क्रीडा, बांधकाम, आरोग्य , पशुसंवर्धन व दुग्धशाळा, महिला व बालकल्याण आणि अर्थ इत्यादी १० विषय समित्यांवर सदस्य म्हणून ८३ सदस्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये भारिप-बमसं २५, शिवसेना १३, भाजप ७, काँग्रेस ४, राष्ट्रवादी काँग्रेस ३ व अपक्ष १ इत्यादी जिल्हा परिषद सदस्यांची विषय समित्यांवर निवड करण्यात आली. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये सहमती झाल्याने विषय समित्यांवर सदस्यांची निवड बिनविरोध करण्यात आली. या निवडीसाठी पक्षाच्यावतीने राज्य प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर व प्रदीप वानखडे यांनीही प्रयत्न केले.
गटनेत्यांच्या बैठकीत सहमती!
जिल्हा परिषदेच्या विविध १० विषय समित्यांवर सदस्यांची निवड करण्याच्या मुद्द्यावर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू झाल्यानंतर भारिप-बमसं गटनेता ज्ञानेश्वर सुलताने यांच्या कक्षात जिल्हा परिषदेतील विविध पक्षांच्या गटनेत्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी शिवसेचे गटनेता आशीष ऊर्फ गोपाल दातकर, भाजपच्या गटनेता माया कावरे, काँग्रेसचे गटनेता सुनील धाबेकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेता सुमन गावंडे उपस्थित होत्या. गटनेत्यांच्या या बैठकीत विषय समित्यांवर पक्षनिहाय जिल्हा परिषद सदस्यांची निवड करण्याच्या मुद्द्यावर सहमती झाली. त्यानंतर मतदान न घेता, बिनविरोध सदस्यांची विषय समित्यांवर निवड करण्यात आली.
बाबासाहेब धाबेकर यांना श्रद्धांजली!
जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेच्या प्रारंभी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांना दोन मिनिट मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.