वारकऱ्यांच्या उपाेषणाची दखल न घेतल्यास आत्मदहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:53 AM2020-12-04T04:53:03+5:302020-12-04T04:53:03+5:30
अकाेला: विश्व वारकरी सेना व वारकरी साहित्य परिषद आणि इतर वारकरी संघटनांच्या विद्यमाने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर वारकऱ्यांचे भजन-कीर्तनासह ...
अकाेला: विश्व वारकरी सेना व वारकरी साहित्य परिषद आणि इतर वारकरी संघटनांच्या विद्यमाने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर वारकऱ्यांचे भजन-कीर्तनासह २ डिसेंबरपासून आमरण उपोषणाला सुरुवात झालेली असून, युवा विश्व वारकरी सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष गणेश महाराज शेटे हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत व इतर वारकरी मंडळी ही साखळी पद्धतीने अमरण उपोषण करीत आहेत. या आंदाेलनाची शासनाने दखल न घेतल्यास महाक्षेत्र पंढरपूर येथे पांडुरंगाच्या महाद्वारात आत्मदहन करेल, असा इशारा विश्व वारकरी सेना संस्थापक अध्यक्ष हभप अरुण महाराज बुरघाटे यांनी दिला. अकाेला जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर सुरू असलेल्या उपाेषणाला शासनाच्या व प्रशासनाच्या एकाही अधिकाऱ्यांनी भेट न दिल्यामुळे वारकरी संप्रदायातील संत मंडळींमध्ये सरकारविषयी तीव्र नाराजीचा सूर दिसून येत आहे. सरकारने जर शंभर भाविकांना धार्मिक कार्यक्रमाला त्वरित परवानगी दिली नाही तर महाक्षेत्र पंढरपूर येथे पांडुरंगाच्या महाद्वारात आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा दिला. उपाेषण आंदाेलनात दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वर महाराज सोळंके, श्रीधर महाराज पातोंड, रामकृष्ण महाराज आंबुस्कर, राम महाराज गवारे यांनी कीर्तन सेवा दिली. उपोषणाला माजी आमदार हरिदास भदे, माजी आमदार बळीराम शिरस्कर, कपिल ढोके, सुधीर ढोणे, जिल्हा परिषद सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, राजेंद्र पातोडे, सिद्धार्थ शिरसाट, धीरज शिरसाट, गोपाल कोल्हे, बालमुकुंद भिरड, गणेश वानखडे, साचिन चेंडाले यांनी भेट दिली. यावेळी विठ्ठल महाराज साबळे, महादेव महाराज निमकंडे, श्रीकृष्ण महाराज बाबुळकर, गोदावरी बंड, शिवहरी महाराज ईस्तापे, गजानन महाराज दहिकर, रामकृष्ण महाराज आंबुस्कर, दिनेश महाराज भामोद्रे, हभप रमेश मामा खिरकर आदी उपस्थित हाेते.
बाॅक्स
आज महिला कीर्तनकारांचे कीर्तन
गेल्या २ तारखेपासून सुरू झालेल्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी उद्या महिला महाराजांचे कीर्तन होणार आहे, अशी माहिती विश्व वारकरी सेनेच्या वतीने कळविण्यात आली आहे.