स्वबळाची तयारी: जिल्हा परिषदसाठी भाजपाचे मिशन ‘३५ प्लस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 02:12 PM2018-07-10T14:12:27+5:302018-07-10T14:20:19+5:30
जि.प. व पंचायत समिती मतदारसंघाची रणनीती ठरविण्यासाठी पूर्णवेळ जबाबदारी निश्चित केली जाणार असून, जिल्हा परिषदेत ‘३५ प्लस’ हे मिशन ठरविल्याची माहिती आहे.
- राजेश शेगोकार
अकोला : भाजपा-शिवसेनेची केंद्र व राज्यात युती असली तरी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी दोन्ही पक्षांनी केली आहे. अकोल्यात तर या दोन पक्षांमध्ये फारसे सख्य नाहीच, त्यामुळे नगरपालिका, महापालिका स्वबळावर जिंकणाºया भाजपाने आता जिल्हा परिषद निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर बुथप्रमुख, शक्तीप्रमुख अशा रचनेसोबतच प्रत्येक जि.प. व पंचायत समिती मतदारसंघाची रणनीती ठरविण्यासाठी पूर्णवेळ जबाबदारी निश्चित केली जाणार असून, जिल्हा परिषदेत ‘३५ प्लस’ हे मिशन ठरविल्याची माहिती आहे.
अकोला जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांची मुदत डिसेंबर २०१८ मध्ये संपुष्टात येत आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोग कामाला लागला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांची संख्या निश्चित करण्यासाठी आयोगाने ग्रामीण लोकसंख्येची माहिती मागवली आहे. २०११ मध्ये केंद्र शासनाने केलेल्या जनगणनेतील लोकसंख्या या निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामध्येच अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींची लोकसंख्याही निश्चित झालेली आहे. दरम्यानच्या काळात अकोला महापालिकेची हद्दवाढ झाल्यामुळे त्या भागाची लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येतून बाद झाली आहे. आता होणाºया जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी सद्यस्थितीत असलेल्या ५३ मतदारसंघाच्या संख्येत पाचने घट होऊ शकते. त्यामुळे होणाºया ४८ ऐवजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात किमान ५० सदस्य संख्या ठेवण्यासाठी मतदारसंघाची रचना करताना कमी लोकसंख्येचा समावेश करून तेवढी संख्या निश्चित होण्याचीही शक्यता आहे. या सर्व जिल्हा परिषद सर्कलमध्ये भाजपाची रणनीती कशी राहील, याची चाचपणी सुरू झाली आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून भाजपाला जिल्हा परिषद ताब्यात घेता आली नाही. महापालिका निवडणूक एकहाती जिंकून भाजपाने इतिहास घडविला असल्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणूक जिंकण्याचा चंग पक्षाने बांधला आहे. खासदार संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद निवडणुकीची रणनीती तयार झाली असून, प्रत्येक सर्कलनिहाय जबाबदारी निश्चित करण्यासाठी बैठक होत आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम
अकोला जिल्हा परिषदेची निवडणूक लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या आधी होऊ घातली आहे. त्यामुळे ही निवडणूक लोकसभा व विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम ठरणार आहे. जिल्हा परिषदेवर भारिप-बमसंची सत्ता असून, भारिपचे संस्थापक अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर हे भाजपासाठी लोकसभेचे तोडीस तोड उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी तसेच खासदार संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेचे रणशिंग फुंकणाऱ्या भाजपासाठी जिल्हा परिषद निवडणूक ही अतिशय प्रतिष्ठेची ठरणार आहे.