आत्मनिर्भर याेजना; फेरीवाल्यांचा महापालिकेत माेर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 10:49 AM2020-11-25T10:49:42+5:302020-11-25T10:49:51+5:30
Akola Municipal Corportation शहरातील फेरीवाल्यांनी मंगळवारी सायंकाळी मनपात धाव घेतली.
अकाेला: काेराेना विषाणू साथीच्या काळात आर्थिक संकटात सापडलेल्या लघू व्यावसायिक, फेरीवाल्यांना आर्थिक मदतीसाठी केंद्र शासनाने लागू केलेल्या आत्मनिर्भर याेजनेच्या अटी व शर्तीमध्ये बदल करण्याची मागणी करीत शहरातील फेरीवाल्यांनी मंगळवारी सायंकाळी मनपात धाव घेतली. यावेळी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्या कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. कोरोना विषाणूच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाने २३ मार्चपासून टाळेबंदी लागू केली होती. यामुळे रस्त्यालगत लघू व्यवसाय उभारणाऱ्या व्यावसायिकांसह नोंदणीकृत फेरीवाले उघड्यावर आले. अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी केंद्र शासनाने १ जूनपासून टाळेबंदी शिथिल करीत लघू व्यावासायिक व फेरीवाल्यांसाठी ‘पंतप्रधान विक्रेता आत्मनिर्भर निधी’ योजनेची घोषणा केली. यामध्ये व्यावसायिकांना १० हजार रुपये कर्ज देण्याची तरतूद करण्यात येऊन राष्ट्रीयीकृत बँकांसह मान्यताप्राप्त बँकामधून कर्ज उपलब्ध करण्याचे निर्देश आहेत. त्या पृष्ठभूमीवर मनपाने नोंदणीकृत फेरीवाल्यांना बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू केली. लाभार्थींना कर्ज उपलब्ध करून देण्यात महापालिका राज्यात अव्वल ठरली असतानाच आता याेजनेतील अटी व शर्ती क्लिष्ट असल्यामुळे कर्ज मिळण्यास अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे शहरातील लघू व्यावसायिक व फेरीवाला संघटनांनी नमूद केले आहे. केंद्र शासनाने अटी शिथिल करून दिलासा द्यावा, अशी मागणी करीत फेरीवाला संघटनेने महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्या कार्यालयात निवेदन सादर केले.
१,६०० लाभार्थींना कर्ज मंजूर
महापालिकेच्या ‘एनयूएलएम’ विभागाने शहरातील लघू व्यावसायिक व फेरीवाल्यांची नाेंदणी करून अर्जांची मागणी केली. मनपाने प्राप्त अर्जांची छाननी केली असता यापैकी १६०० लाभार्थी कर्जासाठी पात्र ठरले. यामध्ये ४७० लाभार्थींच्या खात्यात प्रत्येकी १० हजार रुपये रक्कम जमा झाल्याची माहिती आहे.