पत्रकारांचे आज राज्यभर आत्मक्लेष आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:17 AM2021-05-01T04:17:52+5:302021-05-01T04:17:52+5:30

मराठी पत्रकार परिषद आणि महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाने यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात, एस.एम. देशमुख हे आपल्या गावात एक दिवसाचे ...

Self-torture movement of journalists across the state today | पत्रकारांचे आज राज्यभर आत्मक्लेष आंदोलन

पत्रकारांचे आज राज्यभर आत्मक्लेष आंदोलन

Next

मराठी पत्रकार परिषद आणि महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाने यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात, एस.एम. देशमुख हे आपल्या गावात एक दिवसाचे आत्मक्लेष आंदोलन करीत आहेत. तर बहुजन पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष अकोल्यात निवेदन देतील. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील पत्रकार आंदोलनात सहभागी होऊन यांच्या भूमिकेस पाठिंबा देणार आहेत.

राज्यात एप्रिलमध्ये ५० पत्रकारांचे बळी गेले आहेत. बळींचा एकूण आकडा आता १२२ झाला आहे. या महिन्यात जे पत्रकार मृत्युमुखी पडले ते सारे ३५ ते ५० वयोगटातील होते. पत्रकार परिषदेने केलेल्या मागणीनुसार वेळीच सर्वांना लस दिली गेली असती तर यातील अनेकांचे प्राण वाचले असते. सरकारच्या नाकर्तेपणाचे पत्रकार बळी ठरले आहेत. पत्रकारांना योग्य ते उपचार मिळावेत, त्यांच्यासाठी स्वतंत्र बेडची व्यवस्था करावी, ही मागणीदेखील सरकार पूर्ण करीत नाही. फ्रंटलाइन वर्करचा दर्जा दिला जात नसल्याने मुंबईत पत्रकारांना लोकलमधून प्रवासदेखील करता येत नाही. मृत पत्रकारांच्या नातेवाइकांना केंद्र सरकार पाच लाख रुपये देते, अन्य राज्यांनी ही अशी मदत सुरू केली आहे. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले.

वारंवार मागण्या करूनही सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आत्मक्लेष करून घेण्याची वेळ पत्रकारांवर आली आहे. शनिवारी सकाळी ८ ते सायंकाळी ८ पर्यंत हे आंदोलन चालणार आहे. प्रत्येक तालुका आणि जिल्ह्यातील एक-दोन पत्रकार संबंधित अधिकारी तसेच झेंडावंदनासाठी येणाऱ्या मंत्र्यांना निवेदन देतील.

आंदोलनात सहभागी व्हावे.

सर्वांनी लॉकडाऊनचे नियम पाळत आणि स्वतःची योग्य ती काळजी घेत हे आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी, महिला संघटक जान्हवी पाटील, बहुजन पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस ॲड. सुधाकर खुमकर, विभागीय अध्यक्ष विठ्ठल महल्ले, जिल्हाध्यक्ष अनिल माहोरे, कार्यध्यक्ष नीरज आवंडेकर, जावेद जकारिया, संजय कुडुपले यांनी केले आहे.

Web Title: Self-torture movement of journalists across the state today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.