८६४ च्या पाकीटाची १४०० रुपयांना विक्री; कृषी सेवा केंद्र चालकावर गुन्हा दाखल
By रवी दामोदर | Published: May 29, 2024 03:41 PM2024-05-29T15:41:17+5:302024-05-29T15:43:10+5:30
तेल्हारा तालुक्यातील अडसूळ येथे कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई
रवी दामोदर, अकोला : जिल्ह्यात कपाशीचे विशिष्ट वाणाच्या बीटी बियाण्याचा काळाबाजार होत असल्याचे समोर आले आहे. तेल्हारा तालुक्यातील अडसूळ येथील कृषी सेवा केंद्रामध्ये बियाणे जादा दराने विक्री होत असल्याचे कृषी विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत उघड झाले आहे. तेल्हारा पंचायत समितीचे कृषी अधिकारी भरतसिंग चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून अडसूळ येथील अश्वनी ऍग्रो एजेन्सीचे प्रोप्रा. रामराव रामचंद्र पोहरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात कपाशीच्या विशिष्ट वाणाच्या बियाण्यासाठी शेतकरी पहाटेपासूनच कृषी सेवाकेंद्रांवर रांगा लावत आहेत, परंतू बियाणे मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले. असे असताना ‘त्या’ वाणाच्या बियाण्याची जादा दराने विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. त्यामुळे कृषी विभागाच्या भरारी पथकाने डमी ग्राहकाच्या माध्यमातून बियाणे विक्री करणाऱ्या केंद्रावर छापा टाकून प्रती पाकिट ८६४ रुपये मुळ किंमत असलेले १४०० रुपये याप्रमाणे जादा दराने विक्री होत असल्याचे रंगेहात पकडले. त्यामुळे तेल्हारा पंचायत समितीचे कृषी अधिकारी भरतसिंग चव्हाण यांनी तेल्हारा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अडसूळ येथील मे. अश्वनी ऍग्रो एजेन्सीचे प्रोप्रायटर रामराव रामचंद्र पोहरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरारी पथकाने केली कारवाई
मिळालेल्या गुप्त माहितीवरून जिल्हा कृषी अधीक्षक शंकर किरवे, जि. प.चे जिल्हा कृषी विकास अधिकारी मिलिंद जंजाळ यांच्या मार्गदर्शनात तालुका, जिल्हा भरारी पथकाने छापा टाकून कारवाई केली. या पथकामध्ये मोहिम अधिकारी महेंद्रकुमार सालखे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सतीशकुमार दांडगे, तालुका कृषि अधिकारी गौरव राऊत, पंचायत समितीचे कृषी अधिकारी भरतसिंग चव्हाण, विस्तार अधिकारी कोमल भास्कर, कृषी सहायक प्रदीप तिवाले यांचा समावेश होता.