घर असावे घरासारखे...नकोत नुसत्या भिंती - ज्येष्ठ नागरिक दिन विशेष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 12:40 PM2018-10-01T12:40:59+5:302018-10-01T12:41:39+5:30
अकोला : आई घराचे मांगल्य असते, तर वडील घराचे अस्तित्व असतात; परंतु आता ही संकल्पना मागे पडत आहे. चार मुलांचा सांभाळ करणारे आई-वडील आता मुलांना अडगळ वाटू लागले आहेत. एक मुलगा आई-वडिलांचा सांभाळ करू शकत नाही. हे चित्र अनेकदा आजूबाजूला दिसते. घरातील ज्येष्ठांना काहीही नको असते. त्यांना केवळ हवा असतो आधार, आपुलकी. घर असावे घरासारखे...नकोत नुसत्या भिंती...तेथे असावा प्रेम, जिव्हाळा...नकोत नुसती नाती....
पूर्वीच्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती; परंतु अलीकडच्या काळामध्ये ‘हम दो, हमारा एक’ ही संस्कृती रूढ झाली आणि तळहातावरील फोडाप्रमाणे मुलांना जपणाऱ्या आई-वडिलांना अडगळीत टाकले. त्यांना वृद्धाश्रमात जाण्यास भाग पाडले; परंतु आपणही उद्या वयोवृद्ध, ज्येष्ठ होणार आहोत, याची जाणीव ठेवून घरातील पिकलेल्या पानांची काळजी घ्यायला हवी, त्यांना सन्मानासह आधार द्यावा, एवढीच अपेक्षा ज्येष्ठांना ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आहे. (प्रतिनिधी)
ज्येष्ठ नागरिक कायद्यांतर्गत तरतुदी
या कायद्यांतर्गत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या पाल्यांकडून निर्वाह खर्च देण्याची तरतूद आहे. कायद्याचे कलम-२ प्रमाणे पाल्य म्हणजे ज्येष्ठ नागरिक यांचे रक्तसंबंधातील मुले-मुली, यामध्ये मुलगा, मुलगी, नातू, नात यांचा समावेश आहे. ज्यांचे वय ६0 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा स्त्री-पुरुष व्यक्तींना ‘ज्येष्ठ नागरिक’ म्हणून संबोधण्यात येते. कलम ४(१) प्रमाणे जे ज्येष्ठ नागरिक हे स्वत:च्या उत्पन्नामधून अथवा त्यांच्या मालमत्तेमधून स्वत:चा चरितार्थ चालवू शकत नाहीत, अशा व्यक्तींना चरितार्थासाठी कलम ५ प्रमाणे पालन-पोषणासाठी, निर्वाह भत्त्यासाठी जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाजकल्याण यांच्याकडे अथवा संबंधित जिल्ह्यातील विभागाचे उपविभागीय अधिकारी (महसूल) तथा अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक न्यायाधीकरण यांच्याकडे अर्ज दाखल करता येईल. कायद्यांतर्गत पालकांचा सांभाळ न करणाºया पाल्यांना तीन महिनेपर्यंत तुरुंगवास आणि पाच हजार रुपयांपर्यंतच दंड किंवा दोनही शिक्षांची तरतूद आहे. कायद्यांतर्गत घडणारा गुन्हा हा दखलपात्र आहे.
एक मुलगा वडिलाला सांभाळू शकत नाही...
आई-वडील चार मुला-मुलींना सांभाळतात. त्यांना मोठे करतात; परंतु त्याच मुलांपैकी एकही मुलगा आई-वडिलांना सांभाळण्यासाठी पुढे येत नाही. हा भाऊ सांभाळेल...तो सांभाळेल, असा विचार करून मुले आई-वडिलांची जबाबदारी झटकतात; परंतु तेच आई-वडील कधीच जबाबदारी झटकट नाहीत, याची जाणीव तरी मुलांनी ठेवावी. आम्हाला काही नको...चार दिवस सुख, समाधान आणि आनंदाने जगायला मिळावेत, हीच ज्येष्ठांची अपेक्षा आहे.
- ज्येष्ठ नागरिकांसाठी मातोश्री वृद्धाश्रम योजना
- आई, वडील व ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम-२00७
- आई, वडील व ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी नियम-२0१0
- ६0 वर्षांंवरील ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र देणे
- ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवास भाड्यात (राज्य परिवहन महामंडळ) सवलत. (६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी)
- संजय गांधी निराधार अनुदान योजना
- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना
- इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना