ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने घेतली कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 05:29 PM2021-03-01T17:29:52+5:302021-03-01T17:30:02+5:30
Corona Vaccination in akola जिल्ह्यातील सर्वच लसीकरण केंद्रावर लसीकरण शांततेत सुरू झाले.
अकोला: ज्येष्ठांच्या कोविड लसीकरणाला सोमवारी जिल्ह्यातील ९ केंद्रावर यशस्वी सुरुवात झाली. सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी आल्यात, मात्र तासाभरात ही समस्या निकाली काढल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच लसीकरण केंद्रावर लसीकरण शांततेत सुरू झाले. त्यापैकी प्रमुख असलेले जिल्हा स्त्री रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्रावर ज्येष्ठांनी गर्दी करत मोठ्या उत्साहात लस घेतल्याचे दृष्य दिसून आले. मागील दोन दिवसांपासून कोविन ॲप बंद होते. त्यामुळे ज्येष्ठांची ऑनलाईन नोंदणी कशी करावी, यासह अनेक बाबतीत संभ्रमाची स्थिती होती. सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास कोविन ॲप सुरू झाल्याने काही ज्येष्ठ नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी केली, तर काहींनी थेट जिल्हा स्त्री रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्र गाठले. त्यामुळे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण केंद्रावरच नोंदणी करुन लसीचा पहिला डोस घेतला. सकाळी तासाभरात तांत्रिक अडचण सोडविण्यात आल्याने ज्येष्ठांना सहज लस उपलब्ध झाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. या ठिकाणी ज्येष्ठांमध्ये उत्साह दिसून आला. दुपारीच चार वाजतापर्यंत येथे येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची गर्दी वाढल्याने त्यांना रांगेेत उभे राहावे लागल्याचे चित्र दिसून आले.