सर्वोपचार रुग्णालयात ज्येष्ठ नागरिक होणार ‘सेवाव्रती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:45 PM2018-09-18T12:45:52+5:302018-09-18T12:57:38+5:30
अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत असलेल्या सर्वोपचार रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना मार्गदर्शन व मदत करण्यासाठी आता ज्येष्ठ नागरिकांनीच पुढाकार घेतला आहे.
अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत असलेल्या सर्वोपचार रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना मार्गदर्शन व मदत करण्यासाठी आता ज्येष्ठ नागरिकांनीच पुढाकार घेतला आहे. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या संकल्पनेतून हे ज्येष्ठ नागरिक ‘सेवाव्रती’ होऊन रुग्णांच्या सहकार्यासाठी तत्पर राहणार असून, त्यांच्यासाठी रुग्णालय परिसरात सोमवारी दालन निश्चित करण्यात आले आहे.
गेल्या महिन्यात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी मेळावा घेऊन त्यांच्याशी चर्चा केली असता या चर्चेमधून सर्वोपचारमध्ये येणाºया रुग्णांना होणाºया त्रासाबाबत अनेकांच्या तक्रारी असल्याचे समोर आले. या तक्रारींमध्ये रुग्णांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याची बाब प्रकर्षाने समोर आली. याची नोंद घेत पालकमंत्री डॉ. पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांनीच या कामी पुढाकार घेतला, तर शासनाकडून योग्य ती मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली. त्यानुसार ज्येष्ठ नागरिक संघटनेमध्ये असलेले सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी, आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच इतर नागरिक अशी ४० लोकांची फळी या सामाजिक कामासाठी तयार झाली आहे. या सेवाव्रतींसाठी सर्वोपचारमध्ये एक दालन निश्चित करण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्र्यांनी सोमवारीच सर्वोपचारमध्ये भेट देऊन हे दालन निश्चित केले. येत्या काही दिवसात हे सेवाव्रती प्रत्यक्ष कार्यरत होतील, अशी ग्वाही दिली.
अशी असेल सेवा
सर्वोपचारमध्ये येणारे रुग्ण, त्यांची तपासणी कुठे होणार, औषध कुठे मिळेल, रक्त किंवा इतर तपासण्यांबाबतची माहिती हे ज्येष्ठ नागरिक सेवाव्रती या दालनातून देणार आहेत. एखाद्या रुग्णाला थेट मदत करण्यापासून तर त्याच्या नातेवाइकांचे समुपदेशन करण्यापर्यंत हे सेवाव्रती काम करणार आहेत.
पंतप्रधानांनी रुग्णसेवेला प्राधान्य देत अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्याच्या कार्याप्रती नतमस्तक होत सर्वोपचार मध्ये ‘सेवाव्रती’ हा उपक्रम सुरू करत आहोत. ज्येष्ठ नागरिकांचा पुढाकार व प्रत्यक्ष सहभाग यामुळे रुग्णांना निश्चितच मदत होईल.
- डॉ. रणजित पाटील, पालकमंत्री, अकोला.