जेष्ठ धन्वंतरी के.एस. पाटील यांचे निधन
By Admin | Published: May 22, 2017 01:11 AM2017-05-22T01:11:12+5:302017-05-22T01:11:12+5:30
अकोला: केवळ अकोला जिल्हाच नव्हे विदर्भात प्रख्यात असलेले अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. काशिनाथ उपाख्य डॉ.के.एस. पाटील यांचे २१ मे राविवार रोजी निधन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: केवळ अकोला जिल्हाच नव्हे विदर्भात प्रख्यात असलेले अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. काशिनाथ उपाख्य डॉ.के.एस. पाटील यांचे २१ मे राविवार रोजी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८५ वर्षांचे होते. सायंकाळी स्थानिक मोहता मिल स्मशानभूमीत हजारो नागरिकांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांचे पुत्र डॉ. अभय पाटील यांनी चिताग्नी दिला.
डॉ. के.एस. पाटील यांनी ४५ वर्ष रुग्णांना सेवा दिली. केवळ अकोला जिल्ह्यातच नव्हे नाशिक, जळगाव खान्देशसह विदर्भातील हजारो रुग्णांवर त्यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केल्या.
डॉ. काशिनाथ श्रीपतराव पाटील यांचे मूळ गाव जळगाव खान्देश जिल्ह्यातील बोदवड तालुक्यतील मनूर हे होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण या लहानशा गावात झाले. त्यांनी भुसावळ येथील प्रताप महाविद्यालयातून बीएससीची पदवी घेतल्यानंतर नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर औरंगाबाद येथील घाटी वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी एमएसचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयात आर्थोपेडिक विभाग सुरू करू न काही वर्ष तेथेच कार्य केले. त्यानंतर १९६७ पासून अकोला येथे त्यांनी वैद्यकीय सेवेला प्रारंभ केला. त्यांची ही सेवा २०१५ पर्यंत अखंडपणे सुरू होती. त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी वैद्यकीय सेवा बंद केली.वैद्यकीय सेवेसोबतच डॉ. पाटील यांचे सामाजिक कार्यातही भरीव योगदान होते. सन १९६५ च्या भारत-पाक युद्धात जखमी झालेल्या अनेक सैनिकांवर त्यांनी शस्त्रक्रिया, उपचार केले. विश्व हिंदू परिषदेचे प्रांताध्यक्ष म्हणूनही काही वर्ष त्यांनी काम केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक सक्रिय कार्यकर्ते म्हणूनही त्यांनी काम केले. या भागात मराठा समाजातील पहिले अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी तसेच मुलगा डॉ. अभय पाटील, ३ मुली, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. रविवारी सायंकाळी निघालेल्या त्यांच्या अंत्ययात्रेत खासदार संजय धोत्रे, माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, गुलाबराव गावंडे, प्रा. अजहर हुसेन,माजी आमदार गजानन दाळू गुरुजी, प्रा. तुकाराम बिरकड, नातिकोद्दीन खतीब, डॉ. जगन्नाथ ढोणे, बबनराव चौधरी, दादाराव मते पाटील, श्रीकांत पिसे पाटील, प्रा. उदय देशमुख,विजय मालोकार, शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, प्रकाश मानकर, डॉ. दीपक मोरे, डॉ. संजय सरोदे, डॉ.के.एन. भांबुरकर, डॉ. सुभाष मापारी, डॉ. रणजित कोरडे, डॉ. शिरीष थोरात, शंकरराव वाकोडे, प्रदीप खाडे,रणजित काळे,आश्वीन नवले, प्रकाश तायडे, मार्तंडराव माळी, पंकज जायले,रमेशभाई भोजने, डॉ. अमोल रावणकर, अशोक पटोकार, संजय लुंगे, सुनील जानोरकर, धनराज लाहोळे, कुलट गुरुजी, सुरेश खुमकर, डॉ. सुधीर ढोणे, विनायक पांडे, बाबाराव विखे पाटील, दिलीप बोचे, डॉ. हर्षवर्धन मालोकार, किशोर मांगटे पाटील, डॉ. अशोक ओळंबे, अरविंद अग्रवाल, संजय अग्रवाल, डॉ. राजकुमार हेडा, रमेश कोठारी, अजय शर्मा, संजय शर्मा, गौतम गवई, जावेद अली, डॉ. अविनाश तेलगोटे, अविनाश पाटील, गोपाळराव गालट, श्याम कोल्हे, निवृत्ती वानखडे, ब्रह्मा पांडे, प्रवीण बाणेरकर, डॉ. संतोष भिसे, संतोष ढोरे, हिंमतराव मेंटागे, भागवत पाटील, शंकरराव हागे, यांच्यासह समाजिक, राजकीय, साहित्य क्षेत्रासह विविध क्षेत्रातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते.