ज्येष्ठ सर्वोदयी रामसिंह राजपूत यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 05:37 PM2020-05-31T17:37:18+5:302020-05-31T17:37:50+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे निस्सीम अनुयायी अॅड. रामसिंह राजपूत यांचे ३१ मे रोजी सकाळी निधन झाले.
अकोला : ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे निस्सीम अनुयायी अॅड. रामसिंह राजपूत यांचे ३१ मे रोजी सकाळी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत सहभाग घेतला. एवढेच नव्हे तर त्यांनी स्वत:ची ५ एकर जमीनसुद्धा भूदान चळवळीत दान देऊन टाकली. त्यांच्या निधनाने सर्वोदयी परिवार, गुरुदेव सेवा मंडळ पोरके झाले आहे. १९ मे रोजी त्यांच्या पत्नी कमलाबाई यांचे निधन झाले होते. बारा दिवसानंतर त्यांनीही जगाचा निरोप घेतला.
अॅड. रामसिंह राजपूत हे मूळचे केळीवेळीचे राहणारे. लहानपणापासून वडिलांकडून त्यांच्यावर संस्कार झाले. महात्मा गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा त्यांच्या मनावर मोठा पगडा होता. अख्खं आयुष्य ते गांधी, विनोबा भावे यांच्या विचारांनुसार जगले. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी खादी कापडाचाच वापर केला आणि इतरांनासुद्धा खादीचा वापर करण्याचा ते आग्रह करीत. गांधीजींनी स्वावलंबनाचा मंत्र दिला. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कापसातूनच स्वदेशी कापड निर्माण व्हावे, यासाठी सूतकताईची प्रेरणा दिली. या प्रेरणेतून गांधी जयंतीनिमित्त शहरात ५0 वर्षांपासून सूतकताईचा यज्ञ सुरू करण्यात आला होता. हा यज्ञ सुरू करण्यामागे अॅड. राजपूत यांचा विचार होता. सर्वोदयी मंडळाच्या माध्यमातून सूतकताई यज्ञात अॅड. रामसिंह राजपूत हिरिरीने सहभागी होत. सूतकताई करून त्यापासून बनविलेले खादीचे कापड ते वापरत असत. अॅड. रामसिंह राजपूत हे सर्वोदयी मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक होते. महाराष्ट्र ग्रामदान मंडळाचे सचिव म्हणूनही त्यांनी अनेक वर्ष काम पाहिले. गुरुकुंज मोझरीसह विदर्भातील कुठेही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा कार्यक्रम असो. अॅड. राजपूत हे त्यात सहभाग व्हायचे. अकोल्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीचे ते मार्गदर्शकच होते. राष्ट्रसंतांच्या जयंती, पुण्यतिथी कार्यक्रमात उत्साहाने ते सहभागी होत असत. गावांमध्ये फिरून स्वदेशी, खादी, निसर्गोपचार, ग्रामोद्योगाविषयी ते सातत्याने जनजागृती करीत. गतवर्षी त्यांनी १५0 निसर्गोपचार डॉक्टर तयार करण्याचा संकल्प केला होता. अशा ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्त्याच्या अचानक निघून जाण्यामुळे एक मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.