ज्येष्ठांना पुन्हा मिळणार कोविड लसीचा बूस्टर! आरोग्य यंत्रणेला ‘इन्कोव्हॅक’ लस प्राप्त, नाकावाटे घ्यावी लागणार
By प्रवीण खेते | Published: April 29, 2023 04:55 PM2023-04-29T16:55:26+5:302023-04-29T16:56:35+5:30
ही लस नाकावाटे घ्यावी लागणार असून, अकोल्यातील ज्येष्ठांनादेखील ही लस घेता येणार आहे.
अकोला : कोविडचा संभाव्य धोका पाहता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पुन्हा लसीकरणावर भर दिला जात आहे. त्या अनुषंगाने राज्यभरातील ज्येष्ठांना लसीचा बूस्टर डोस दिला जाणार आहे. ही लस नाकावाटे घ्यावी लागणार असून, अकोल्यातील ज्येष्ठांनादेखील ही लस घेता येणार आहे.
जिल्ह्यात सद्य:स्थितीत कोविडची स्थिती नियंत्रणात असली तरी राज्यातील इतर भागात कोविड वाढताना दिसून येत आहे. कोविडचा संभाव्य धोका लक्षात घेता आरोग्य यंत्रणेमार्फत सतर्कता म्हणून पुन्हा लसीकरणावर भर दिला जाणार आहे. मात्र, यंदा नाकावाटे दिली जाणारी ‘इनोव्हॅक’ लस उपयोगात आणली जाणार आहे. प्रिकॉशन म्हणून ज्येष्ठांना बूस्टर डोस दिला जाणार आहे. यासंदर्भात १८ एप्रिल रोजी आरोग्य सेवा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत राज्य शासनामार्फत कोविड १९ लसीकरण कार्यक्रमांतर्गत नाकावाटे घ्यावयाच्या इन्कोव्हॅक लसीची खरेदी करून जिल्हा व महापालिका आरोग्य यंत्रणेला वितरित करण्याची सूचना दिली होती. त्या अनुषंगाने जिल्ह्यासाठी ‘इन्कोव्हॅक’ लसीचा साठा प्राप्त झाला असून, लवकरच जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात होणार असल्याची माहिती लसीकरण अधिकाऱ्यांनी दिली.
जिल्ह्याला मिळाले ५०० डोस -
महापालिका क्षेत्रासाठी - २०० डोस
ग्रामीण क्षेत्रासाठी - ३०० डोस
मंगळवारपासून मोहीम सुरू होण्याची शक्यता -
आराेग्य यंत्रणेला प्राप्त झालेला ‘इन्कोव्हॅक’ लसीचा साठा लसीकरण केंद्रांना वितरित करण्यात आला आहे. मात्र, सलग तीन दिवस सुट्टी आल्याने ही मोहीम मंगळवार, २ मेपासून सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.
ग्रामीण भागात तालुकास्तरावरच लसीकरण
लसीचा मर्यादित साठा उपलब्ध असल्याने मोजक्याच केंद्रांवर लसीकरण सुरू केले जाणार आहे. ग्रामीण भागात केवळ तालुकास्तरावरच ही मोहीम राहणार असून, लाभार्थींना ग्रामीण रुग्णालयात ही लस उपलब्ध होणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
नाकावाटे घेतली जाणारी ‘इन्कोव्हॅक’ लस ही सध्या ज्येष्ठ नागरिकांनाच दिली जाणार आहे. जिल्ह्यासाठी लसीचा साठा उपलब्ध झाला असून, लसीकरण केंद्रांना तो वितरित करण्यात आला आहे. लवकरच लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार असून, ज्येष्ठांनी ही लस घ्यावी.
- डॉ. विनोद करंजीकर, जिल्हा लसीकरण अधिकारी, अकोला